ANI
राष्ट्रीय

Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये राज्यांकडे दुर्लक्ष, विरोधकांचा सभात्याग

केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ दोन राज्ये वगळता अन्य राज्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीतील पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ दोन राज्ये वगळता अन्य राज्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीतील पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला. अर्थसंकल्पातून केवळ बिहार आणि आंध्रप्रदेशलाच निधी आणि योजना मिळाल्या आहेत. अन्य कोणत्याही राज्यांचा उल्लेखही नाही, हा अर्थसंकल्प 'खुर्ची वाचवा' अर्थसंकल्प आहे, असे टीकास्त्र काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोडले.

अर्थमंत्र्यांचा पलटवार

दरम्यान, इंडिया आघाडीने केलेला आरोप अपमानकारक आहे, असा पलटवार करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ‘यापूर्वीही काँग्रेसने सादर केलेल्या अर्थसंकल्पासह कोणत्याही अर्थसंकल्पांमध्ये सर्व राज्यांच्या उल्लेख पाहावयास मिळाला नाही. महाराष्ट्राचा उल्लेख नव्हता तरीही वाढवण बंदरासाठी ७६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख करण्यात आला नाही याचा अर्थ महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्यात आले असा होतो का, असा सवालही त्यांनी विचारला.

इंडिया आघाडीची निदर्शने

केंद्रीय अर्थसंकल्पात विरोधी पक्षशासित राज्यांबद्दल भेदभाव केल्याच्या निषेधार्थ बुधवारी इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या संकुलात निदर्शने केली. हा अर्थसंकल्प म्हणजे भारताच्या संघराज्य रचनेच्या पावित्र्यावर करण्यात आलेला हल्ला आहे, असे या वेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, सपाचे नेते अखिलेश यादव, काँग्रेसचे अनेक खासदार, त्याचप्रमाणे तृणमूल, द्रमुक आणि डाव्या पक्षांचे खासदार निदर्शनात सहभागी झाले होते.

हा अर्थसंकल्प जनताविरोधी असून त्यामधून कोणलाच न्याय देण्यात आलेला नाही, सरकारने विशेष पॅकेजच्या गोष्टी केल्या मात्र विशेष दर्जा दिला नाही, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. इंडिया आघाडीतील खासदारांसह आज रालोआच्या खुर्ची बचाव अर्थसंकल्पाचा आम्ही निषेध केला. देशातील प्रत्येक राज्याला समान न्याय मिळवून देण्यासाठी यापुढेही आवाज उठविला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले. उत्तर प्रदेशवर पुन्हा एकदा अन्याय झाल्याचे सपाचे नेते अखिलेश यादव म्हणाले. त्यांनी रोजगार हिरावून घेतला आणि आता शिकाऊ उमेदवाराच्या गप्पा मारत आहेत, असे ते म्हणाले. युवकांना खोटी आश्वासने देण्यात आल्याची टीका सपाच्या जया बच्चन यांनी केली. आम्हाला भारताचा अर्थसंकल्प हवा एनडीएचा नको, अशा आशयाचे फलकही या वेळी फडकावण्यात आले.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी