यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस; हवामान विभागाचा पहिला अधिकृत अंदाज 
राष्ट्रीय

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस; हवामान विभागाचा पहिला अधिकृत अंदाज

यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हे प्रमाण 'सामान्यपेक्षा कमी' या श्रेणीत येते.

Swapnil S

मुंबई : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसह संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लक्ष लागून राहिलेल्या नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी जाहीर केला. यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हे प्रमाण 'सामान्यपेक्षा कमी' या श्रेणीत येते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यंदाच्या मान्सूनवर 'एल निनो' या हवामान स्थितीचे सावट राहण्याची शक्यता आहे. डॉ. मोहापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर या काळात 'एल निनो'ची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची भीती असते. दिलासादायक बाब म्हणजे, याच काळात हिंदी महासागरात 'इंडियन ओशन डायपोल' सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. हा सकारात्मक आयओडी 'एल निनो'च्या नकारात्मक प्रभावाला रोखण्यास मदत करतो, त्यामुळे पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघू शकते. जून ते ऑगस्ट दरम्यान पावसाची स्थिती सुरुवातीला सामान्य राहण्याची अपेक्षा आहे.

धोक्याची घंटा

खासगी हवामान संस्थांनी यापूर्वीच मान्सून कमकुवत राहण्याचे संकेत दिले होते, त्यावर आता सरकारी मोहोर उमटली आहे. पावसाचे प्रमाण ९२ टक्के राहिल्यास शेतीकामांचे नियोजन, पेरण्या आणि पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून असल्याने, हा अंदाज धोरणकर्त्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.

IIT Bombay मध्ये छतावरील पंख्यांऐवजी भिंतीवरचे पंखे

Jalgoan : विद्यार्थ्यांच्या मनात पेटणार ‘ज्योती’; २८ जिल्ह्यांतील १ हजार ८०० शाळांमध्ये लघुपट दाखवणार

छत्रपती संभाजीनगर : मुकुटबन-गडचांदूर रेल्वेमार्गासाठी ४९३ कोटींची मंजुरी

माझी प्रकृती उत्तम - सलमान खानचा खुलासा

हरित लवादाचे मोदी सरकारकडून खच्चीकरण; काँग्रेसचा आरोप, उद्योगांच्या बाजूने निकाल होत असल्याची तक्रार