दहशतवादाचा कणा मोडण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी एक धाडसी पाऊल उचलत पाकिस्तानच्या हद्दीत खोलवर जाऊन ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले आणि अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या उपस्थितीत बुधवारी पत्रकार परिषद घेऊन याची अधिकृत माहिती देण्यात आली.
ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट काय होते?
विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले.” या कारवाईचा प्रमुख उद्देश दहशतवादी गटांचे प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करणे हा होता. ही कारवाई अत्यंत काळजीपूर्वक रचली गेली. नागरिकांचे प्राण आणि मालमत्तेचे नुकसान होऊ नये याची पूर्ण दक्षता घेण्यात आली. “कारवाईसाठी अशी ठिकाणं निवडण्यात आली होती जिथे कोणतीही नागरी मालमत्ता किंवा नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उध्वस्त
या कारवाईत एकूण नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. हे तळ संबंधित दहशतवादी संघटनांचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र होते. ही ठिकाणं नियंत्रण रेषेपासून (LoC) अंतर राखून काळजीपूर्वक निवडण्यात आली होती. गुप्तचरांकडून मिळालेल्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे कोणत्या अड्ड्यांना लक्ष्य करायचं हे निश्चित करण्यात आलं होतं.
सवाई नाला कॅम्प – नियंत्रण रेषेपासून ३० किमी
गुलपूर कॅम्प (लष्कर-ए-तोयबाचा बेस) – नियंत्रण रेषेपासून ३० किमी
बर्नाला कॅम्प – नियंत्रण रेषेपासून ९ किमी
कोटली अब्बास – नियंत्रण रेषेपासून २० किमी
सरजल कॅम्प, सियालकोट – आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून ६ किमी
महमूना जोया – आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून १२ ते १८ किमी
मरकज तैयबा, मुरीदके – आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून १८ ते २५ किमी (अजमल कसाब व डेविड हेडलीला इथेच प्रशिक्षण दिलं गेलं होतं)
मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर – आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून १०० किमी (जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय)
१०० किमी आत घुसून हल्ला
यात उल्लेखनीय म्हणजे सीमेपासून १०० किमी अंतरावर असलेले बहावलपूर येथील मरकज सुभान अल्लाह या तळाला देखील बेचिराख करण्यात आले. हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय म्हणून काम करणारे एक महत्त्वाचे दहशतवादी ठिकाण होते.
हल्ल्याचा परिणाम : पाकिस्तानातील दहशतवादी तळ नेस्तनाबूत
कर्नल सोफिया कुरेशी यांनी मीडियाला कारवाईचे व्हिडीओ पुरावे दाखवले. यामध्ये मरकज तैयबा, मुरीदके कॅम्प उडवतानाचीही दृष्य होती. याच कॅम्पमध्ये २००८च्या मुंबई हल्ल्यासाठी अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. हे सर्व अड्डे प्रभावीपणे नष्ट करण्यात आले. “कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि आतापर्यंत पाकिस्तानमध्ये नागरिकांच्या जीवितहानीचे कोणतेही वृत्त नाही.” त्यामुळे ही कारवाई अत्यंत अचूकतेने पार पाडण्यात आल्याचे अधोरेखीत झाले आहे, असे कुरेशी यांनी म्हटले.
...तर परिस्थिती चिघळू शकते, भारताने दिला इशारा
याद्वारे भारताने पाकिस्तानच्या सीमेत घुसून जवळपास १०० किमी आतमध्ये जाऊन कारवाई केली आहे. त्याचसोबत, “भारतीय कारवाईत कोणतेही लष्करी अथवा नागरी स्थळ लक्ष्य केले गेलेले नाही, मात्र पाकिस्तानकडून कोणतीही चूक किंवा आगळीक झाल्यास परिस्थिती चिघळू शकते,”असा सज्जड दम देखील विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानला दिला.
दरम्यान, २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मिरच्या पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक भ्याड हल्ला केला. यात २५ भारतीय व एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली. त्या हल्ल्याचा अखेर भारताने बदला घेतला असून देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत आणि दहशतवादाविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे देखील जगाला दाखवून दिले आहे.