नवी दिल्ली : बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणीला (एसआयआर) तीव्र विरोध दर्शवत आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचे गंभीर आरोप करत विरोधी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी सोमवारी संसदेच्या मकरद्वारापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला व आयोगाविरुद्धचा आपला संताप व्यक्त केला. हा मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवला व काही खासदारांना ताब्यात घेतले.
यावेळी दिल्ली पोलिसांनी नेत्यांचा मार्ग रोखण्यासाठी अनेक बॅरिकेड्स उभारले होते. मात्र, निर्बंध असूनही अनेक नेते त्यावरून उडी मारून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसले. सपाचे नेते अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, तर तृणमूल काँग्रेसच्या दोन महिला खासदारांना यावेळी भोवळ आली.
यावेळी आंदोलक खासदारांनी 'एसआयआर' आणि 'मतचोरी' असे लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या. मोर्चा सुरू करण्यापूर्वी संसद भवनाच्या मकरद्वारावर सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, सुप्रिया सुळे, प्रियांका गांधी, महुआ मोईत्रा, टी. आर. बालू (द्रमुक), संजय राऊत (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे), डेरेक ओ'ब्रायन (तृणमूल काँग्रेस), अखिलेश यादव (समाजवादी पक्ष) यांच्यासह द्रमुक, राजद आणि डाव्या पक्षांचे अनेक खासदार सहभागी झाले होते.
संसदेच्या मकरद्वारापासून ही निदर्शने सुरू झाली. खासदारांनी निवडणूक सदन येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच करत असताना त्यांनी निवडणूक आयोगावर “मतचोर” असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली, पण दिल्ली पोलिसांनी हस्तक्षेप करत विरोधी पक्षांच्या खासदारांचा मार्ग अडवला आणि त्यांना निवडणूक आयोगाच्या परिसरात पोहोचण्यापासून रोखले.
संसदेपासून भारतीय निवडणूक आयोगापर्यंतचा मोर्चा पोलिसांनी रोखल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडवरून उडी मारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. अखिलेश यादव यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धरणे आंदोलनादरम्यान केंद्र सरकारवर टीका करताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणाले, ते आम्हाला रोखण्यासाठी पोलिसांचा वापर करत आहेत. मोर्चात सहभागी झालेल्या समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी उत्तर प्रदेशातील अलीकडच्या पोटनिवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाच्या हाताळणीवर टीका केली. केवळ मतांचीच चोरी झाली नाही, तर मतदान केंद्रेही ताब्यात घेण्यात आली होती, असेही त्या म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी सोमवारी विरोधी खासदारांना बरोबर घेत व्होट चोरीच्या विरोधात मोर्चा काढला. या ठिकाणी काही प्रमाणात संघर्ष निर्माण झाला. काही खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. संसद भवन मार्ग पोलीस ठाण्यात या खासदारांना नेण्यात आले.
राहुल, प्रियांकांना घेतले ताब्यात
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी अखिलेश यादव यांनी विचारले की, आम्हाला पोलीस का रोखत आहेत, आम्ही शांततेत मोर्चा काढला आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहातील २५ पक्षांचे ३०० खासदार या मोर्चात सहभागी झाले आहेत. संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढत आहोत. आम्हाला स्पष्ट आणि सुरक्षित मतदार यादी पाहिजे, ‘एक व्यक्ती, एक मत’ यासाठी आमची लढाई असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
मतचोरीचे सत्य देशासमोर, आमचा अधिकार मिळवणारच!
यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोग चर्चेला का घाबरत आहे? आज आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार होतो, मात्र इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना थांबवण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आले. मतचोरीचे सत्य आता देशासमोर आहे. ही लढाई राजकीय नाही. ही लोकशाही, संविधान आणि ‘एक व्यक्ती, एक मत’ या अधिकाराचे रक्षण करण्यासाठीची लढाई आहे. विरोधी पक्ष आणि देशातील प्रत्येक मतदाराची मागणी आहे, ती स्वच्छ मतदार यादीची. आम्ही हा अधिकार कोणत्याही परिस्थितीत मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.