नवी दिल्ली : निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि ‘एसआयआर’ प्रक्रियेच्या निषेधार्थ तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीने रविवारी पुन्हा एकदा एल्गार पुकारला. ‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मदतीशिवाय नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होऊच शकले नसते. ज्ञानेश कुमार यांनी मतचोरीचा कट रचला आहे आणि त्यांना तुरुंगात जायलाच हवे,’ असा थेट आरोप करत राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’च्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी केली.
तब्बल चार तास चाललेल्या या रॅलीत २० विरोधी पक्ष सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. या महारॅलीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि एम. ए. बेबी यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी नेत्यांनी भाषणे केली.
हा तर तरुण, शेतकरी, सामान्य जनतेचा हुंकार
रामलीला मैदानावरील सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, ‘नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापर्यंत जो संदेश पोहोचवायचा होता, तो या जनसागराने पोहोचवला आहे. हा केवळ एका राजकीय पक्षाचा आवाज नाही, तर देशातील तरुण, शेतकरी आणि सामान्य जनतेचा हुंकार आहे. या देशातील लोकशाही आम्ही कोणत्याही परिस्थितीत संपुष्टात येऊ देणार नाही. तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल, तुम्ही स्वतःला खूप मोठे समजत असाल; पण लक्षात ठेवा, तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही’. विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संघटनांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. तसेच सणासुदीच्या काळात स्थानिक विक्रेत्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्याकडून खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी आंदोलकांना केले.
बंगालमध्ये हरलो नाही, हरवले गेले - ममता बॅनर्जी
‘आम्ही हार मानणार नाही, आम्ही आमचा जीव देऊ, आम्ही लढू. आमचा बंगाल लुटला गेला आहे. आम्ही लोकशाही वाचवू. लोकशाही लुटली गेली आहे, हक्क लुटले गेले आहेत, मतमोजणी लुटली गेली आहे. तुम्ही केवळ मतांचा पराभव केला नाही, तर संपूर्ण मतमोजणीचाच पराभव केला आहे. आम्ही बंगालमध्ये हरलो नाही, हरवले गेले,” असे पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.
केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा - शरद पवार
ज्ञानेश कुमार यांच्यासंदर्भात केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यायची आवश्यकता आहे. निर्णय घेतला नाही, त्यामुळे दिल्लीत विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. सुप्रिया सुळे आणि संजय राऊत हे आंदोलनातून लढणार आहेत. माझे लक्ष पाणी-चारा आणि दुष्काळावर आहे. यंदा आमच्याकडे दिवाळी नाही, आम्ही दिवाळी साजरी करणार नाही. सध्या शेतकरी आणि जनता भीषण पाणी व चाऱ्याच्या समस्येला तोंड देत आहे, असे दुष्काळी दौऱ्यावर निघालेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.
ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवणे गरजेचे
देशाची व्यवस्था रुळावर आणण्यासाठी सर्वात आधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवणे गरजेचे आहे. अमित शहा म्हणतात की, नरेंद्र मोदी कुठेही जाणार नाहीत. पण मी सांगू इच्छितो की, जनता त्यांना सत्तेत राहू देणार नाही. ज्ञानेश कुमार यांच्यानंतर या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असे राहुल गांधी म्हणाले.
२०२४ची निवडणूकच बेकायदेशीर -राहुल
‘२०२४ च्या निवडणुकीनंतर १३.५ कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. प्रत्येक सात मतदारांपैकी एकाचे नाव वगळण्यात आले, म्हणजेच १५ टक्के मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी केवळ ३ टक्के होती. याचा अर्थ २०२४ ची निवडणूक बेकायदेशीर होती. हे मी म्हणत नाही; हा निवडणूक आयोगाचा डेटा आहे. मी जे काही सांगतो ते सत्य आहे. मी कोविडबद्दल जे बोललो ते सत्य होते,’ अशा शब्दांत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले.
देशासाठी यापुढेही रक्त सांडू - फारूख अब्दुल्ला
‘आपल्याला फक्त देवाची भीती बाळगायची आहे, या लोकांची नाही. ते सतत मुस्लिमांकडे बोट दाखवतात, हे सांगण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. ते म्हणतात की, हे पाकिस्तानी आहेत. मला भाजपला सांगायचे आहे की, आम्ही भारतासाठी आमचे रक्त सांडले आहे, यापुढेही सांडत राहू. आम्हाला या देशात राहायचे आहे,’ असे नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले.
भूमिगत झाले, तरी ज्ञानेश कुमारांना शोधू - खर्गे
‘जोपर्यंत ज्ञानेश कुमार जात नाहीत, तोपर्यंत आम्ही लढा देत राहू. ज्ञानेश कुमार भूमिगत झाले तरी आम्ही त्यांना शोधून परत आणू. तुम्ही सीबीआय, ईडी यासारख्या यंत्रणांचा वापर करून घाबरवण्याचा प्रयत्न करता, पण आम्ही घाबरणार नाही. आजचे केंद्र सरकार, बिहार सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार ही सर्व चोरीची सरकारे आहेत. या चोरांना हटवलेच पाहिजे, असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
मतचोरी हा देशद्रोहच...
‘ज्ञानेश कुमार आमचे वैरी नाहीत, पण आजचा हा आवाज लोकशाही वाचवण्याचा आहे. देशाचा आवाज दाबण्याचे काम त्यांनी केले आहे. ज्ञानेश कुमार यांना रात्री झोप लागत नाही. मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील निवडणुकांमध्ये मतचोरी झाली. ज्ञानेश कुमार यांना हटवणे हे आमचे पहिले पाऊल आहे. ज्ञानेश कुमार ‘सीईसी’ पदावरून पायउतार होतील आणि तुरुंगात जातील. व्होटचोरी ही सामान्य नाही. ही भारतातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांची चोरी आहे. हे एक अत्यंत दुर्मिळ पाप आहे, हा देशद्रोह आहे. ज्ञानेश कुमार यांच्याशिवाय देशात भाजपची सत्ता आली नसती,’ असेही राहुल गांधी म्हणाले.