Photo : X
राष्ट्रीय

ब्रिक्स सुरक्षा परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार

वाढत्या भू-राजकीय आणि प्रादेशिक सुरक्षा आव्हानांवर चर्चा करण्यासाठी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी, रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगु आणि इतर उच्चस्तरीय ब्रिक्स सुरक्षा अधिकारी सोमवारी नवी दिल्लीत दोन दिवसीय परिषदेसाठी एकत्र येणार आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : वाढत्या भू-राजकीय आणि प्रादेशिक सुरक्षा आव्हानांवर चर्चा करण्यासाठी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी, रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगु आणि इतर उच्चस्तरीय ब्रिक्स सुरक्षा अधिकारी सोमवारी नवी दिल्लीत दोन दिवसीय परिषदेसाठी एकत्र येणार आहेत.

ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या या परिषदेचे अध्यक्षपद भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल भूषवणार आहेत. या चर्चेत वांग यी सहभागी होणार असल्याचे चीनने आधीच जाहीर केले आहे. याशिवाय, चीनी परराष्ट्र मंत्र्यांची डोवाल यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होण्याचीही शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे उपसचिव नेझामीपूर हे या परिषदेत सामील होण्याची शक्यता आहे. ही परिषद सप्टेंबरमध्ये भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेची पार्श्वभूमी तयार करणार आहे.

या प्रभावशाली गटाचा सध्याचा अध्यक्ष या नात्याने भारत या शिखर परिषदेचे यजमानपद भूषवत आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या 'ब्रिक्स' गटाचा २०२४ मध्ये विस्तार करण्यात आला., ज्यात इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश झाला, तर २०२५ मध्ये इंडोनेशिया या गटात सामील झाला.

ब्रिक्स हा जगातील ११ प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना एकत्र आणणारा एक प्रभावशाली गट म्हणून समोर आला आहे. हा गट जागतिक लोकसंख्येच्या सुमारे ४९.५ टक्के, जागतिक जीडीपीच्या सुमारे ४० टक्के आणि जागतिक व्यापाराच्या सुमारे २६ टक्के भागाचे प्रतिनिधित्व करतो.

ब्रिक्सचे हे उच्च सुरक्षा अधिकारी पश्चिम आशियातील परिस्थिती तसेच रशिया-युक्रेन संघर्षासह एकूण प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून जम्मू-काश्मीरला लक्ष्य करणाऱ्या सीमापार दहशतवादी कारवायांसह दहशतवादाबाबतच्या आपल्या चिंता भारत या बैठकीत उपस्थित करण्याची शक्यता आहे.

या विषयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील संघर्षावरही या चर्चेत विचार केला जाऊ शकतो.

सुरक्षेच्या आव्हानांवर चर्चा करणार

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, 'या बैठकीत 'ब्रिक्स' सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार/प्रतिनिधी मंडळांचे प्रमुख 'आज जगाला भेडसावणारी गैर-पारंपरिक सुरक्षा आव्हाने' या विषयावर आपले विचार मांडतील.

हे अधिकारी राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांचे झपाट्याने बदलणारे स्वरूप, तसेच उदयोन्मुख सुरक्षा धोक्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची भूमिका यावरही चर्चा करतील.

'राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार/प्रतिनिधी मंडळांचे प्रमुख दहशतवादविरोधी आणि माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाच्या वापरादरम्यानच्या सुरक्षेबाबत नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स संयुक्त कार्यगटांच्या परिणामांचा आढावा घेतील,' असे मंत्रालयाने सांगितले.

विधिमंडळाचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन टायगर, पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी, विषारी दारूकांडाचे मुद्दे गाजणार

भिवंडीत फेमस शोरमा हॉटेलवर बुलडोझर; अन्न विषबाधाग्रस्त रुग्णांची संख्या १०७ वर; महापालिकेने केली कारवाई

मंच्युरियनमध्ये आढळले पालीचे पिल्लू; उल्हासनगरातील तरुणीची प्रकृती बिघडली

लाडकी बहीणनंतर शिवसेनेचे लाडकी सून अभियान; राज्य प्रमुखपदी मीनाक्षी शिंदे, महिलांच्या न्यायासाठी उभारणार सक्षम यंत्रणा

Mumbai : उच्च रक्तदाब ठरतोय आरोग्याचा मोठा धोका; फादर्स डे निमित्ताने डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता