नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामधून १५ जुलैला पुन्हा पृथ्वीवर परतणार आहेत. ‘ॲक्सिओम-४’ या व्यावसायिक मोहिमेंतर्गत शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) गेले होते. हे चार अंतराळवीर सोमवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.५० वाजता ‘आयएसएस’वरून पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.
शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर हे मंगळवारी दुपारी ३ च्या दरम्यान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरण्याची शक्यता आहे. त्यांचा हा तब्बल २२ तासांचा प्रवास असेल. परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी हा एक अविश्वसनीय प्रवास होता, असे म्हटले आहे. शुभांशू शुक्ला आणि ‘ॲक्सिओम-४’ या अंतराळ मोहिमेतील त्यांच्याबरोबरचे आणखी तीन क्रू सदस्य हे जवळपास १८ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहिले होते.
शुभांशू शुक्ला यांच्या परतीच्या प्रवासाबाबत ‘नासा’ने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या मोहिमेत कोणताही अडथळा आलेला नाही. दरम्यान, शुक्लाच्या ‘आयएसएस’च्या प्रवासासाठी अंदाजे ५५० कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. आजचा भारत स्पेसमधून महत्त्वाकांक्षी, निर्भीड, आत्मविश्वासाने व अभिमानाने भरलेला दिसतो. याच सर्व कारणांमुळे मी पुन्हा एकदा म्हणू शकतो की आजचा भारत आजही ‘सारे जहाँ से अच्छा’ दिसतो. लवकरच जमिनीवर भेटू, असे शुक्ला यांनी म्हटले आहे.