१३ भारतीय खलाशांच्या सुरक्षेवर दूतावासाचे लक्ष 
राष्ट्रीय

१३ भारतीय खलाशांच्या सुरक्षेवर दूतावासाचे लक्ष

युक्रेनच्या काळ्या समुद्राच्या (ब्लॅक सी) किनारपट्टीजवळ 'एमव्ही आमीर १' या व्यापारी जहाजावर १३ भारतीय खलाशी अडकले असून, सततच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावास या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

Swapnil S

कीव्ह / नवी दिल्ली : युक्रेनच्या काळ्या समुद्राच्या (ब्लॅक सी) किनारपट्टीजवळ 'एमव्ही आमीर १' या व्यापारी जहाजावर १३ भारतीय खलाशी अडकले असून, सततच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावास या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. जहाजावर उपस्थित असलेल्या सर्व भारतीय कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दूतावास सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याचे बुधवारी स्पष्ट करण्यात आले.

युक्रेनच्या ओडेसा बंदरावर २५ जुलै रोजी 'एमव्ही एजीएन रॅग्नार' या मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ही नवी घटना समोर आली आहे. त्या हल्ल्यावेळी जहाजावर चार भारतीय खलाशी होते, ज्यापैकी दोन जण अद्याप बेपत्ता असून युक्रेनी अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे.

कीव्ह येथील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना म्हटले आहे की, "एमव्ही आमीर १ या जहाजावरील भारतीय खलाशांच्या संदर्भातील परिस्थिती आमच्या निदर्शनास आली आहे. आम्ही या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देत असून, जहाजावरील सर्व भारतीयांच्या सुरक्षेसाठी संबंधित यंत्रणांच्या सतत संपर्कात आहोत.

'फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया' या संघटनेने भारत सरकार आणि इतर संबंधित प्राधिकरणांकडे या खलाशांची तातडीने सुटका करून त्यांना मायदेशी परत आणण्याचे आवाहन केल्यानंतर दूतावासाचे हे विधान आले आहे. 'एमव्ही आमीर १' हे जहाज सध्या युक्रेनच्या चोर्नोमोर्स्क बंदरात उभे असून त्यावर एकूण १५ कर्मचारी आहेत, ज्यामध्ये १३ भारतीय खलाशांचा समावेश आहे. जहाजाच्या अगदी जवळ वारंवार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले होत असल्यामुळे खलाशी सतत भीती आणि धोक्याच्या छायेखाली जगत असल्याचे संघटनेने सांगितले आहे.

भारताची स्पष्ट भूमिका

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, 'एमव्ही एजीएन रॅग्नार'वरील बेपत्ता दोन भारतीय खलाशांच्या शोधासाठी भारत युक्रेनच्या प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत आहे आणि त्यांच्या कुटुंबांशीही संपर्कात आहे. व्यापारी जहाजे, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना कोणत्याही परिस्थितीत लक्ष्य केले जाऊ नये, यावर भारताने नेहमीच भर दिला आहे. तसेच, रशिया-युक्रेन संघर्ष हा संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या (डीप्लोमसी) माध्यमातूनच सोडवला जावा, असे भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वंदे मातरमचा अपमान आता फौजदारी गुन्हा; विधेयक राज्यसभेत मंजूर

जन्ममृत्यू नोंदींबाबत नवे सुधारणा ‌विधेयक

मुंबईत पावसाचा जोर वाढणार! ठाणे, रायगड, पालघरमध्ये कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील विक्रम मोडणार

दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; मेट्रो स्थानकांमध्ये शिरलं पाणी, रस्तेही जलमय

शाळांजवळ ५० मीटरच्या परिसरात 'जंक फूड' विक्री बंद; कठोर कारवाईचा FDA चा इशारा