कोलकाता : संरक्षण क्षेत्रातील पीएसयू गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई) लिमिटेडने शनिवारी भारतीय नौदलाला एक अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट (पाणबुडीविरोधी नौका) सुपूर्द केले. आठ जहाजांच्या मालिकेतले हे दुसरे जहाज आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की ‘अंद्रोथ’ असे या जहाजाचे नाव आहे. या श्रेणीतील पहिली युद्धनौका ‘अर्नाळा’ ८ मे रोजी नौदलाला दिली. त्यानंतर काही महिन्यांत दुसरी युद्धनौका नौदलाला सोपवली. यामुळे भारताची सागरी सुरक्षा आणखी बळकट झाली आहे.
लक्षद्वीप द्वीपसमूहातील ‘अंद्रोथ’ बेटाच्या नावावरून या जहाजाला नाव दिले. या युद्धनौकेवर स्वदेशी ३० मिमीची नौदल गन बसवली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय नौदलाने अशा १६ अत्याधुनिक अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट्सची ऑर्डर दिली. त्यापैकी आठ जीआरएसईकडून आणि आठ इतर भारतीय शिपयार्डकडून बांधण्यात येणार आहेत.
जीआरएसईने सर्व आठ जहाजे पाण्यात सोडली असून यापैकी हे दुसरे जहाज नौदलाकडे सुपूर्द झाले आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही जहाजे किनारी भागातील सागरी तळाचे पूर्ण प्रमाणात सर्वेक्षण, शोध व हल्ले करण्यास सक्षम आहेत.
तसेच, ही जहाजे विमानांसोबत समन्वय साधून पाणबुडीविरोधी कारवाईसाठी सक्षम आहेत. यावर कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम, हलकी टॉर्पोडो तसेच पाणबुडीविरोधी रॉकेट्स बसवले जाणार आहेत.