रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! जादा सामानासाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही; जाणून घ्या नवे नियम 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! जादा सामानासाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही; जाणून घ्या नवे नियम

याआधी जादा सामान नेण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. आता...

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : ट्रेनने प्रवास करताना जादा सामानामुळे पार्सल कार्यालयाच्या रांगेत उभे राहण्याची कटकट आता संपणार आहे. भारतीय रेल्वेने ३१ जुलैपासून अतिरिक्त सामानासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा सुरू केली असून, आता पात्र प्रवासी घरबसल्या जादा सामानाची नोंदणी करून शुल्क भरू शकणार आहेत.

नवी ऑनलाइन सुविधा सुरू

भारतीय रेल्वेने प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि पार्सल कार्यालयांवरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने ही नवी सेवा सुरू केली आहे. याआधी जादा सामान नेण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. आता ही प्रक्रिया ऑनलाइन करता येणार आहे.

कोणत्या प्रवाशांना मिळणार सुविधा?

ही सुविधा केवळ कन्फर्म आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.

या वर्गातील प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात -

  • एसी फर्स्ट क्लास

  • एसी २-टियर

  • फर्स्ट क्लास

  • स्लीपर क्लास

  • सेकंड क्लास

मात्र एसी ३-टियर, एसी ३ इकॉनॉमी आणि एसी चेअर कार प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध नाही.

जादा सामानासाठी किती शुल्क?

मोफत परवानगीपेक्षा अधिक पण कमाल मर्यादेच्या आत सामान असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

  • किमान शुल्क : ३० रुपये

  • शुल्काची गणना : १० किलोच्या टप्प्यांनुसार

  • किमान अंतर : ५० किलोमीटर

मोफत किती सामान नेता येणार?

  • एसी फर्स्ट क्लास - ७० किलो (कमाल १५० किलो)

  • फर्स्ट क्लास / एसी २-टियर - ५० किलो (कमाल १०० किलो)

  • स्लीपर क्लास - ४० किलो (कमाल ८० किलो)

  • सेकंड क्लास - ३५ किलो (कमाल ७० किलो)

  • एसी ३-टियर / एसी चेअर कार - ४० किलो (कमाल ४० किलो)

मर्यादेपेक्षा अधिक सामान जाहीर न करता नेल्यास रेल्वे नियमांनुसार दंड आकारला जाऊ शकतो.

सामानाच्या आकाराबाबत नियम

रेल्वेने सामानाच्या आकाराबाबतही नियम निश्चित केले आहेत.

  • ट्रंक, सूटकेस किंवा बॉक्ससाठी साधारण कमाल आकार १०० x ६० x २५ सेंमी

  • एसी ३-टियर आणि एसी चेअर कारमध्ये ५५ x ४५ x २२.५ सेंमी इतकी मर्यादा लागू राहील.

ऑनलाइन बुकिंग कसे कराल?

  • रेल्वेच्या Parcel Portal किंवा IRCTC वर जा.

  • प्रवासाची माहिती, ट्रेन क्रमांक आणि सामानाची माहिती भरा.

  • प्रणाली शुल्क, सामानाची मर्यादा आणि नियम दाखवेल.

  • अर्ज सादर करून ई-फॉरवर्डिंग नोट डाउनलोड करा.

  • प्रवासाच्या दिवशी सामान पार्सल कार्यालयात दाखवून अंतिम वजन आणि शुल्काची प्रक्रिया पूर्ण करा.

  • त्यानंतर रेल्वे रिसीट (RR) घ्या. गंतव्य स्थानकावर सामान मिळवण्यासाठी ही रिसीट आवश्यक असेल.

SMS द्वारे मिळणार माहिती

सामानाचा प्रवास Track & Trace सुविधेद्वारे पाहता येणार असून, सामान गंतव्य स्थानकावर पोहोचल्यानंतर प्रवाशांना एसएमएसद्वारे सूचनाही मिळणार आहे.

प्रवाशांनी लक्षात ठेवाव्यात 'या' गोष्टी

  • आपल्या प्रवासी वर्गानुसार मोफत सामानाची मर्यादा तपासा.

  • मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास ऑनलाइन नोंदणी करा.

  • बुकिंगची पावती सोबत ठेवा.

  • प्रतिबंधित वस्तू सोबत ठेवू नका.

  • प्रत्येक बॅगेवर नाव आणि संपर्क क्रमांक लिहा.

भारतीय रेल्वेच्या या नव्या उपक्रमामुळे जादा सामानासंदर्भातील प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि प्रवाशांसाठी सोयीची होणार असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Bhiwandi Building Collapse : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

VIDEO : पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहिलं, पतीने भररस्त्यात पट्टा काढला अन्...

ठाणे-घोडबंदर मार्गावरील खराब रस्त्यांची दखल; पालिकेला वाहतूक विभागाची नोटीस, काशिमीरा शाखेची कारवाई

केडीएमसीचे दोन कर्मचारी निलंबित; फेरीवाला निर्मूलन मोहिमेत हलगर्जी भोवली