संयुक्त राष्ट्रे : युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या (यूनएफपीए) अहवालानुसार, भारताची लोकसंख्या अंदाजे १४४ कोटींपर्यंत वाढली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे १४४.७ कोटी लोकसंख्येसह भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे, तर चीनची लोकसंख्या सुमारे १४२.५ कोटी आहे. भारताची लोकसंख्या ७७ वर्षांत दुप्पट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
भारतातील अंदाजे २४ टक्के लोकसंख्या ० ते १४ वयोगटातील असून १७ टक्के लोक १० ते १९ वयोगटातील आहेत, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. १० ते २४ वयोगटातील लोक २६ टक्के असण्याचा अंदाज आहे, तर १५ ते ६४ वयोगटातील लोकसंख्या ६८ टक्के आहे. २०११ मध्ये झालेल्या शेवटच्या जनगणनेदरम्यान भारताची लोकसंख्या १२१ कोटी होती. देशात पुरुषांचे आयुर्मान ७१ वर्षे आणि महिलांचे ७४ वर्षे आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, भारतातील माता मृत्यू मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.