संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

अवैध भारतीयांबाबत अमेरिकेशी चर्चा सुरू : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

परदेशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्यांना मायदेशात पाठविण्याची प्रक्रिया नवी नाही.

Swapnil S

नवी दिल्ली : परदेशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्यांना मायदेशात पाठविण्याची प्रक्रिया नवी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ती सुरू आहे. तथापि, अमेरिकेतून परत पाठविण्यात येणाऱ्या नागरिकांसमवेत कोणत्याही प्रकारचा दुर्व्यवहार होऊ नये, यासाठी आम्ही अमेरिकेच्या सरकारसोबत चर्चा करीत आहोत, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी राज्यसभेत स्पष्ट केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीरपणे घुसलेल्या भारतीयांची मायदेशात पाठवणी सुरू केली आहे. मात्र, त्यांना ज्या पद्धतीने भारतात पाठविण्यात आले त्यावरून गुरुवारी राज्यसभेत मोठा गदारोळ माजला. त्यावर परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर म्हणाले की, अमेरिकेतून परत पाठविण्यात येणाऱ्या नागरिकांसमवेत कोणत्याही प्रकारचा दुर्व्यवहार होऊ नये यासाठी आम्ही अमेरिकेच्या सरकारसोबत चर्चा करीत आहोत. भारतीय नागरिकांना हातपाय बांधून पाठवण्यात आल्याने निर्माण झालेल्या वादावर बोलताना जयशंकर यांनी सांगितले की, २०१२ पासून लागू झालेल्या एका नियमानुसार जेव्हा लोकांना विमानातून माघारी पाठवण्यात येते, तेव्हा त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बांधून ठेवण्यात येते.

महिला, मुलांना सवलत

‘आयसीई’ने दिलेल्या माहितीनुसार, याबाबतीत महिला आणि मुलांना सवलत देत या प्रक्रियेपासून दूर ठेवले जाते. म्हणजेच त्यांना बांधून ठेवले जात नाही. अमेरिकेने देशात बेकायदेशीररीत्या घुसखोरी करणाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. बेकायदेशीररीत्या अमेरिकेत घुसलेल्या भारतीय नागरिकांपैकी काही जणांना अमेरिकन प्रशासनाने बुधवारी एका विशेष लष्करी विमानातून भारतात परत पाठवले होते. मात्र अमेरिकन प्रशासनाने या भारतीय नागरिकांची पाठवणी करताना त्यांना संपूर्ण प्रवासादरम्यान हातापायात बेड्या घालून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे संताप व्यक्त होत आहे.

एस. जयशंकर म्हणाले की, आपले नागरिक जर परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे दिसून आले, तर त्यांना परत आपल्याकडे घेणे ही सर्व देशांची जबाबदारी आहे. अमेरिकेमध्ये अशा बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या लोकांना माघारी पाठवण्याची प्रक्रिया तेथील ‘इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट ऑथॉरिटी‘ करते. अमेरिकेतून माघारी पाठवण्यात आलेल्या नागरिकांच्या मुद्द्यावरून राज्यसभेमध्ये मोठा गोंधळ झाला. या गोंधळादरम्यानच सभापती जगदीप धनखड यांनी याप्रकरणी मंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

प्रक्रिया नवी नाही

त्यानंतर दुपारी जयशंकर यांनी अमेरिकेने १०४ भारतीय स्थलांतरितांना माघारी पाठवल्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले. जयशंकर यांनी अमेरिकेत अवैधपणे गेलेल्या भारतीयांच्या मुद्द्यावर संसदेच्या नियम २५१ अंतर्गत निवेदन दिले. ही कारवाई अमेरिकेच्या नियमांनुसार करण्यात आली आहे, अशी कारवाई यापूर्वीही करण्यात आली आहे. ही नवीन प्रक्रिया नाही, असे ते म्हणाले. परत पाठवले जात असलेल्या नागरिकांच्या सोईसाठी अन्न आणि इतर गरजांची काळजी घेतली जाते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय सेवांचाही समावेश असतो. आवश्यकता असल्यास किंवा शौचासाठी जावयाचे असल्यास स्थलांतरितांना बंधनातून मुक्त केले जाते. हे नियम चार्टर नागरी विमान तसेच लष्कराच्या विमानासाठीही लागू आहेत. अमेरिकेने ५ फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या उड्डाणादरम्यानही यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता, असे जयशंकर यांनी सांगितले.

प्रियांकांचा सवाल

बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या लोकांविरोधातही ट्रम्प प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. याविरोधात संसदेतही पडसाद उमटले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी संसद भवनाबाहेर निदर्शने केली. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना हद्दपार करण्याविरोधात काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी संसद भवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदी आणि ट्रम्प चांगले मित्र आहेत, तर मग त्यांनी हे का होऊ दिले, असा सवाल गांधी यांनी उपस्थित केला.

भारतातील ७.५० लाख नागरिक अवैध पद्धतीने अमेरिकेत राहत असल्याचे दिसून आले आहे. त्यांना टप्प्याटप्प्याने मायदेशात परत पाठवण्यात येणार आहे. अमेरिकेतील १०४ हिंदुस्थानींची पहिली तुकडी बुधवारी अमृतसर येथे पाठवण्यात आली. त्यांना मालवाहू विमानातून पाठवण्यात आले. त्यांच्या हातात बेड्या आणि पायात साखळदंड होते. त्यांना अशा अपमानास्पद पद्धतीने हिंदुस्थानात पाठवल्याबाबत देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविरोधात देशात तीव्र भावना आहे. याचा निषेध करत गुरुवारी संसद परिसरात विरोधकांनी सरकारचा निषेध केला आहे.

संसदेबाहेर निदर्शने

विरोधी पक्षांनी हातात फलक घेत सरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेते या निदर्शनात सहभागी झाले होते. मोदी सरकार जागे व्हा! हिंदुस्थानींचा अपमान सहन करणार नाही, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच खडसावले. सरकारने अमेरिकेला याबाबत सुनावायला हवे, असेही विरोधकांनी म्हटले आहे.

लोकसभा तहकूब

अमेरिकेतील भारतीयांची मायदेशात पाठवणी करण्याच्या प्रश्नावरून गुरुवारी लोकसभेत गदारोळ माजला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेच्या कामकाजाच्या पहिल्या सत्रातही सभागृहाचे कामकाज कोणत्याही कामकाजाविना गोंधळामुळे तहकूब करण्यात आले होते.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...

CSMT टाळण्याचे प्रवाशांना रेल्वेचे आवाहन; मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प