इंधन दरवाढीचा फटका! आजपासून देशभरात २५० फ्लाइट्स रद्द; 'या' मार्गांवरील प्रवाशांची गैरसोय 
राष्ट्रीय

इंधन दरवाढीचा फटका! आजपासून देशभरात २५० फ्लाइट्स रद्द; 'या' मार्गांवरील प्रवाशांची गैरसोय

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासाची मागणी वाढलेली असतानाच हा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

वाढत्या इंधन दरांचा फटका आता थेट विमान प्रवाशांना बसत आहे. इंधन खर्चात झालेली मोठी वाढ आणि प्रवासाच्या मागणीत आलेली घट यामुळे इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रमुख विमान कंपन्यांनी देशांतर्गत उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (दि.१) दररोज सुमारे २५० फ्लाइट्स कमी होणार असून त्याचा परिणाम मुंबई, दिल्ली, बंगळुरूंसह अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील प्रवाशांवर होणार आहे.

जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये ही कपात कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासाची मागणी वाढलेली असतानाच हा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे.

प्रमुख शहरांतील विमानसेवांवर परिणाम

मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या प्रमुख विमान वाहतूक केंद्रांवर या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक तसेच पर्यटनासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अनेक मार्गांवरील फ्लाइट्सची वारंवारता कमी केली जाणार आहे.

मुंबईहून जयपूर, गोवा, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, नागपूर, पाटणा आणि भोपाळ या शहरांकडे जाणाऱ्या उड्डाणांमध्ये कपात केली जाणार आहे. तर दिल्लीहून गोवा, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, लखनऊ, कोची आणि कोलकाता या मार्गांवरील फ्लाइट्समध्येही घट करण्यात येणार आहे.

एअर इंडियाकडून सर्वाधिक कपात

एअर इंडिया जून आणि जुलै महिन्यांत आपल्या देशांतर्गत उड्डाण वेळापत्रकात तब्बल २२ टक्के कपात करणार आहे. सध्या कंपनी दररोज सुमारे ५०० देशांतर्गत उड्डाणे चालवत असून या कपातीमुळे जवळपास ११० उड्डाणे कमी होणार आहेत.

ही कपात तात्पुरती असून वाढत्या इंधन खर्चामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. बाजारातील मागणी आणि विमानसेवा चालवण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील, असेही कंपनीकडून सांगण्यात आले.

इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचीही क्षमता कमी

इंडिगोकडून सध्या दररोज २,२०० फ्लाइट्स चालवल्या जातात. इंडिगो कंपनी आपल्या देशांतर्गत क्षमतेत ५ ते ७ टक्के कपात करत असून त्यामुळे जवळपास ११० फ्लाइट्स कमी होणार आहेत. याशिवाय, एअर इंडिया एक्स्प्रेसनेही आपल्या देशांतर्गत सेवांमध्ये १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कंपनी दररोज ३४० देशांतर्गत फ्लाइट्स चालवते.

वाढते इंधन दर ठरत आहेत मुख्य कारण

एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किंमतींमध्ये झालेली मोठी वाढ हे या कपातीमागील प्रमुख कारण मानले जात आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार देशांतर्गत जेट इंधनाच्या किंमती जवळपास २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय इंधन दरातही मोठी वाढ झाली आहे. इंधन हा विमान कंपन्यांच्या खर्चातील सर्वात मोठा घटक असल्याने विमानसेवा चालवण्याचा खर्च प्रचंड वाढला आहे.

याशिवाय, वाढत्या खर्चामुळे काही प्रवासी अनावश्यक प्रवास टाळत असल्याने मागणीतही काहीशी घट झाली आहे. त्यामुळे खर्च आणि मागणी यामध्ये संतुलन राखण्यासाठी विमान कंपन्यांनी उड्डाण कपातीचा मार्ग स्वीकारला आहे.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद