जयपूर : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पक्षाने चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्याची पक्षातूनच हकालपट्टी करण्यात आली आहे.
दिवंगत नेते सत्यपाल मलिक यांनी गेल्या काही काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका मांडली होती, तर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पद सोडण्यास भाग पाडले गेले, असा आरोप करण्यात येत आहे. या दोन जाट नेत्यांवर भाजपने अन्याय केला, असा आरोप मध्य प्रदेशमधील भाजपच्या एका प्रवक्त्याने केला होता. आता पक्षाने या प्रवक्त्याची हकालपट्टी केली आहे.
शुक्रवारी भाजपचे प्रवक्ते कृष्ण कुमार जानू यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मात्र यासाठी कारण वेगळेच दिले गेले. जूनमध्ये झुंझुनू जिल्ह्याच्या अध्यक्षपदी हर्षिनी कुल्हारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीला आक्षेप घेत केलेल्या टिप्पणीमुळे जानू यांना पक्षातून काढल्याचे सांगितले जात आहे. मध्य प्रदेश भाजपच्या राज्य शिस्तपालन समितीचे अध्यक्ष ओंकारसिंह लखावत यांनी म्हटले की, २० जून रोजी जानू यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. याला नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली.
जानू यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी सत्यपाल मलिक यांना कथित अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल आणि जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदावरून तडकाफडकी बाजूला केल्याबद्दल संताप व्यक्त केला होता. दोघेही जाट नेते असल्यामुळेच त्यांच्यावर अन्याय झाला असे जानू या व्हिडीओत बोलत होते.