दुडू (जयपूर) : जयपूर-अजमेर महामार्गावर मंगळवारी (दि.७) रात्री १० वाजता एका रासायनिक टँकरची एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकशी टक्कर झाली. या अपघातानंतर टँकरच्या केबिनमध्ये आग लागली. ही आग सिलिंडरपर्यंत पोहोचताच २०० सिलिंडरचा लागोपाठ स्फोट होऊन परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ५ वाहने जळाली.
जयपूरमधील डुडू येथील मोखमपुराजवळ हा अपघात झाला. पाच पार्क केलेल्या वाहनांनाही यामुळे आग लागली. या घटनेनंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. बुधवारी पहाटे ४:३० च्या सुमारास महामार्ग पुन्हा सुरू करण्यात आला.
स्फोटानंतर काही सिलिंडर ५०० मीटर अंतरावर शेतात पडले. १० किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. सुमारे दोन तास सिलिंडरचा स्फोट होत राहिला. या अपघातात एक व्यक्ती जिवंत जळाली. १२ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तीन तासांनंतर ही आग आटोक्यात आणली. ट्रकमध्ये अंदाजे ३३० सिलिंडर होते.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आरटीओ गाडी पाहून टँकरचालकाने गाडी ढाब्याकडे वळवली. यादरम्यान, ती गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकला धडकली.