राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी; दोडा येथे पूरस्थिती, चौघांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील थाथरी उपविभागात मंगळवारी सकाळी ढगफुटी झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल १० हून अधिक घरे वाहून गेली असून अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

नेहा जाधव - तांबे

जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील थाथरी उपविभागात मंगळवारी सकाळी ढगफुटी झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल १० हून अधिक घरे वाहून गेली असून अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक आलेल्या पुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

ढगफुटीनंतर चिनाब नदी तसेच तिच्या उपनद्या धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहेत. दोडा जिल्ह्यातील कलनाई नदीने प्रचंड वेग घेतला असून पाण्याचा प्रवाह शहरात शिरला. त्यामुळे बाजारपेठा, रस्ते आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. कठुआ जिल्ह्यातील तराना नदी, उझ नदी, सहर खाड आणि रवी नदी यांचीही पाणीपातळी वाढली आहे.

वाहतूक विस्कळीत, महामार्ग बंद

पूर आणि भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. रामबन जिल्ह्यातील चंदरकोट, केला मोर आणि बॅटरी चश्मा येथे टेकड्यांवरून दगड कोसळल्याचे प्रकार नोंदवले गेले आहेत. किश्तवार जिल्ह्यात त्रैथ नाल्याजवळील पडेर रस्ता, तसेच उधमपूरमधील रामनगर-उधमपूर रस्ता आणि दोड्याचा जंगलवार-थाथरी रस्ता भूस्खलनामुळे बंद आहेत.

हवामान खात्याचा इशारा

हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कठुआ जिल्ह्यात सर्वाधिक १५५.६ मिमी पाऊस नोंदवला गेला. दोड्यातील भादरवाह येथे ९९.८ मिमी, जम्मूत ८१.५ मिमी तर कटऱ्यात ६८.८ मिमी पाऊस पडल्याचे रेकॉर्ड आहे. जम्मू, सांबा, कठुआ आणि इतर भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याने लोकांना जलस्रोतांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पूरग्रस्त भागांत मदत व बचावकार्य वेगाने सुरू असून अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तथापि, मुसळधार पावसामुळे आणि डोंगरकड्यांवरून सतत दगड कोसळत असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

दोडा, किश्तवार आणि कठुआसह जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट

आझाद मैदानात उपोषण करण्यास HC ची मनाई; पण जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम; म्हणाले - "कोर्ट आम्हाला १०० टक्के...

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटलांना हायकोर्टाचा धक्का; परवानगीशिवाय आझाद मैदानात उपोषणास मनाई

'या रीलमध्ये चुकीचं काय?' रोहित पवारांकडून अथर्व सुदामेची पाठराखण; 'तो' व्हिडिओही पुन्हा केला शेअर

विवाहित लेकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पकडले; बापाने दोघांनाही विहिरीत ढकलून संपवले, धक्कादायक घटनेने नांदेड हादरले