राष्ट्रीय

‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षेचा निकाल जाहीर; मुलांमध्ये वेद लाहोटी, तर मुलींमध्ये द्विजा पटेल अव्वल

Swapnil S

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रासमार्फत घेण्यात आलेल्या ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत आयआयटी दिल्ली विभागातील वेद लाहोटी मुलांमधून, तर आयआयटी बॉम्बे विभागातील द्विजा पटेल ही मुलींमधून अव्वल ठरली आहे. तसेच या परीक्षेत ४८ हजार २४८ विद्यार्थी ‘आयआयटी’ प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रासमार्फत २६ मे रोजी ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या १ आणि २ या दोन्ही पेपरला १ लाख ८० हजार २०० विद्यार्थी बसले होते. यापैकी ४८ हजार २४८ विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यामध्ये ४० हजार २८४ मुले, तर ७ हजार ९६४ मुली पात्र झाल्या आहेत. आयआयटी दिल्ली विभागाचा वेद लाहोटी ‘कॉमन रँक लिस्ट’मध्ये अव्वल क्रमांकावर आहे. त्याला ३६० पैकी ३५५ गुण मिळाले आहेत, तर आयआयटी बॉम्बे विभागाची द्विजा धर्मेशकुमार पटेल ही ‘सीआरएल’ ७ सह मुलींमध्ये अव्वल ठरली आहे. तिला ३६० पैकी ३३२ गुण मिळाले आहेत.

विभागनिहाय निकालात आयआयटी बॉम्बेमधील राजदीप मिश्रा (सीआरएल ६) याने अव्वल स्थान पटकावले आहे, तर आयआयटी दिल्लीचा वेद लाहोटी (सीआरएल १) आणि आयआयटी गुवाहाटी विभागातील अविक दास (सीआरएल ६९), आयआयटी कानपूरच्या मान्य जैन, आयआयटी भुवनेश्वर विभागातून मॅचा बालादित्य आणि आयआयटी मद्रासच्या भोगलापल्ली संदेश यांनी अनुक्रमे सीआरएल ७५, ११ आणि ३ मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे.

१० जून ते २६ जुलैपर्यंत समुपदेशन प्रक्रिया

‘जेईई ॲडव्हान्स’ उत्तीर्ण झालेले विद्यार्थी समुपदेशनासाठी पात्र असून समुपदेशन प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. समुपदेशन प्रक्रिया ५ टप्प्यात असेल. १० जून ते २६ जुलैपर्यंत समुपदेशन चालेल. एकूण २३ आयआयटी, ३२ एनआयटी आणि इतर संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

४८ हजार २४८ विद्यार्थी पात्र, १७९ परदेशी भारतीय नागरिक उत्तीर्ण

दरम्यान, सात विदेशी विद्यार्थी ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षेत पात्र ठरले आहेत, तर १७९ परदेशी भारतीय नागरिकांना (ओसीआय) ही परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश मिळाले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त