रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होणार असून त्यासाठी पूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांची पत्नी कल्पना सोरेन आणि विरोधी पक्षनेते अमरकुमार बौरी (भाजप) यांच्यासह ३८ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतपेटीत बंद होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान १३ नोव्हेंबर रोजी पार पडले होते.
या ३८ मतदारसंघांसाठी १४ हजार २१८ मतदान केंद्रे असून त्यापैकी ३१ मतदान केंद्रांवरील मतदानाची मुदत सायंकाळी चार वाजेपर्यंतच आहे. एकूण १.२३ कोटी मतदार असून त्यामध्ये ६०.७९ लाख महिला आणि १४७ तृतीयपंथी मतदार आहेत. राज्यातील विधानसभेच्या एकूण ८१ मतदारसंघांमध्ये एकूण ५२८ उमेदवार आज ३८ जागांसाठी मतदान निवडणुकीच्या रिंगणात असून त्यामध्ये ४७२ पुरुष, ५५ महिला आणि एका तृतीयपंथी उमेदवाराचा समावेश आहे.
सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृतवाखालील सरकार आपल्या कल्याणकारी योजनांवर पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करीत आहे, तर विरोधकांनी हिंदुत्व, भ्रष्टाचार आणि बांगलादेशातून होणारी घुसखोरी हे प्रश्न उपस्थित केले आहेत.
२०० कोटी रुपयांचे बेकायदेशीर साहित्य जप्त
आचारसंहिता जारी झाल्यापासून जवळपास २०० कोटी रुपयांचे बेकायदेशीर साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे, तर आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या ९० तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी २८ जागा, तर अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी नऊ जागा आरक्षित आहेत.