राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या आक्षेपार्ह विडंबनात्मक गाण्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री मुंबईतील युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये असलेल्या हॅबिटॅट स्टुडिओवर हल्ला करीत सेटची तोडफोड केली. याबाबत बोलताना, "माझ्यासोबत झालेल्या घटनेची (बीएमसीची बुलडोझर कारवाई) ते (कुणाल कामरा) खिल्ली उडवत होते. पण त्या घटनेला मी या घटनेशी अजिबात जोडणार नाही. कारण माझ्यासोबत जे झालं होतं ते बेकायदेशीर होतं आणि हे कायदेशीर आहे", अशी प्रतिक्रिया अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी दिली आहे.
कंगना २०२० च्या घटनेचा उल्लेख करत होत्या. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारशी झालेल्या वादानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) त्यांचे मुंबईतील कार्यालय पाडले होते. ती घटना पूर्णतः बेकायदेशीर होती आणि कुणाल कामरासोबत झालेली घटना कायदेशीर आहे असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना कंगना यांनी 'कौन है ये लोग' असे म्हणत कुणाल कामराला चांगलेच फटकारले. तसेच, ऑटो-रिक्षाचालक ते राज्याचे उपमुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक देखील केले.
माझ्यासोबत झालेल्या घटनेशी जोडू नका
माझ्यासोबत झालेल्या घटनेला याच्याशी जोडू नका कारण ते पूर्णतः बेकायदेशीर कृत्य होते आणि ही पूर्णतः कायदेशीर कारवाई आहे , त्यामुळे दोन्ही घटना जोडता येणार नाहीत, असे कंगना यांनी म्हटले.
कौन है ये लोग -
पुढे बोलताना, "ज्या लोकांसाठी त्यांची इज्जतच सर्वकाही आहे, पण तुम्ही कॉमेडीच्या नावाखाली त्यांची बदनामी करताय. त्यांची अपकिर्ती करताय, त्यांच्या कामाचा अनादर करताय. शिंदेजी कधी एकेकाळी रिक्षा चालवायचे आणि आज स्वतःच्या हिंमतीवर ते इतके पुढे आले आहेत", असे कंगनाने सांगितले. पुढे बोलताना, "मस्करी करणारे हे लोक कोण आहेत...कौन है ये लोग...जे स्वतः जीवनात काहीच करु शकले नाही. कॉमेडीच्या नावाखाली शिवीगाळ करतात. कॉमेडीच्या नावाखाली आपल्या धर्मग्रंथांची खिल्ली उडवणारे, लोकांची चेष्टा करणारे, माता-भगिनींची चेष्टा करणारे हे स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणवतात. आपला समाज कुठे चाललाय याचा विचार करावा लागेल," असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, "मी माफी मागणार नाही, एकनाथ शिंदे यांच्याबाबत अजित पवार जे बोलले होते, तेच मी म्हटले आहे", असे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.