राष्ट्रीय

"मुलगा माझ्यासारखा दिसत नाही..."; पत्नीवरील संशयामुळे पित्यानेच घेतला सहा वर्षीय मुलाचा जीव; चौकशीत धक्कादायक खुलासा

कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटनेत पत्नीवरील संशयातून पित्यानेच सहा वर्षांच्या मुलाचा जीव घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलाला शाळेत प्रवेश देण्याच्या बहाण्याने नेऊन...

Mayuri Gawade

पत्नीवर संशय घेत आणि मित्रांच्या टोमण्यांना बळी पडत एका पित्याने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मार्च महिन्यात घडलेला हा प्रकार मुलगा बेपत्ता झाल्यानंतर काही आठवड्यांनी समोर आला.

संशयातून घडला क्रूर प्रकार...

विजापूर जिल्ह्यातील नागठाणे येथील मल्लिकार्जुन आरकेरी याला पत्नी भाग्यश्रीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा आपला नसल्याचा संशय तो सतत व्यक्त करत होता. याच दरम्यान मित्रांनीही मुलगा आपल्यासारखा दिसत नसल्याचे टोमणे मारल्याने त्याचा संशय अधिकच वाढला. यामुळे गेल्या वर्षभरापासून पती पत्नीमध्ये सतत वाद देखील व्हायचे.

शाळेत प्रवेशाचा बहाणा, पण थेट मृत्यूच्या दारी

माहितीनुसार, १६ मार्च रोजी मल्लिकार्जुनने मुलाला सिंदगी तालुक्यातील निवासी शाळेत प्रवेश देण्याचा बहाणा करून सोबत नेले. मात्र, त्याने मुलाला महाराष्ट्र सीमेवरील कृष्णा नदीकाठी नेऊन पुलावरून नदीत फेकून दिले आणि घरी परतला. त्यानंतर काहीच घडले नसल्याच्या अविर्भावात तो घरात वावरत होता.

वाढदिवसाच्या निमित्ताने उघड झाला प्रकार

१ एप्रिल रोजी भाग्यश्रीने मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सिद्धार्थला घरी आणण्याचा आग्रह धरला. काही दिवस टाळाटाळ केल्यानंतर मल्लिकार्जुन अचानक फरार झाला. त्यामुळे संशय अधिक वाढला.

यानंतर भाग्यश्रीने सिंदगी येथील शाळेत चौकशी केली असता, मुलगा तिथे शिकत नसल्याचे समोर आले. यानंतर तिने विजापूर ग्रामीण पोलिसांत मुलगा आणि पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

पोलिस तपासात उघड झाला थरार

पोलिसांनी शोधमोहीम राबवत मल्लिकार्जुनला शेजारच्या कलबुर्गी जिल्ह्यातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मुलाला महाराष्ट्र सीमेवरील कृष्णा नदीवरील पुलावरून फेकून दिल्याची कबुली दिली.

दरम्यान, माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी कराड परिसरात कृष्णा नदीकाठावर एका अज्ञात मुलाचा मृतदेह आढळून आला होता. मात्र त्यावेळी त्याची ओळख पटली नव्हती. नंतरच्या तपासात हा मृतदेह सिद्धार्थचाच असल्याचे स्पष्ट झाले.

या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून, एका निष्पाप जीवाचा संशयाच्या विळख्यात बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी