भुवनेश्वर : ओडिशातील कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) विद्यापीठात रविवारी रात्री एका नेपाळी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतर तणाव निर्माण झाला. २० वर्षीय प्रकृती लम्साल असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव असून, तिने आपल्या वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात नेपाळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले.
या आंदोलनानंतर नेपाळ दूतावासाने या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत २१ वर्षीय वर्गमित्र अध्विक श्रीवास्तव याला अटक केली आहे, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.
या घटनेनंतर सुमारे ५०० नेपाळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य रस्त्यावर आंदोलन छेडले. परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला, असेही इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
या घटनेनंतर काही नेपाळी विद्यार्थ्यांना कटक रेल्वे स्थानकावर पाठवण्यात आले. एका विद्यार्थ्याने ANI ला सांगितले की, "आम्हाला सकाळी अचानक वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले. काल एका नेपाळी विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला होता. आम्ही आंतरराष्ट्रीय कार्यालयात यासंदर्भात माहिती घेण्यासाठी गेलो, पण काही माहिती मिळाली नाही. आम्ही तिथे रात्रभर धरणे आंदोलन केले. आम्हाला परत वसतिगृहात पाठवण्यात आले, मात्र नंतर अचानक एक तासाच्या आत संपूर्ण सामानासह बाहेर जाण्यास सांगण्यात आले. आमच्याकडे काहीही नाही, आम्ही कुठे जाऊ हेच आम्हाला समजत नाही. आम्ही अजूनही तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही उपाशी आहोत."
विद्यार्थ्यांना वसतिगृहातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आल्याच्या वृत्तानंतर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी दोन अधिकाऱ्यांना विद्यापीठात पाठवले आणि या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यांनी X (माजी ट्विटर) वरून पोस्ट करत सांगितले की, "नेपाळी विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी राजनैतिक स्तरावर सरकार या प्रकरणात हस्तक्षेप करत आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहे."
रविवार संध्याकाळी एअरपोर्टजवळून आरोपी अध्विक श्रीवास्तवला अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुवनेश्वर DCP पिनाक मिश्रा यांनी माध्यमांना सांगितले की,
"रविवार संध्याकाळी सिद्धांत सिग्डेल नावाच्या विद्यार्थ्याने तक्रार दिली की, त्याची चुलत बहीण प्रकृती हिने वसतिगृहात आत्महत्या केली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. आमच्या वैज्ञानिक तपास पथकाने तिचा लॅपटॉप आणि मोबाइल जप्त केला, कारण आंदोलक विद्यार्थ्यांनी हे पुरावे तपासात समाविष्ट करण्याची मागणी केली होती."
प्रकृती लम्साल ही B.Tech करत होती. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तिच्या चुलत भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अध्विक श्रीवास्तव हा प्रकृतीला ब्लॅकमेल करत होता, त्यामुळे तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता आहे. ही घटना विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. विद्यापीठ प्रशासनाने अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.