कोलकाता : कोलकातामधील आर. जी. कार रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर करण्यात आलेल्या बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच येथील विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आरोपींची ओळख पटली -
या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केले असून त्यामध्ये एक माजी विद्यार्थी आणि त्याच संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री १० ते १०.५० वाजेपर्यंत आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या काळात पीडिता दयेची याचना करीत होती, पण आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. कॉलेजचे माजी युनिट अध्यक्ष असलेले मोनोजित मिश्रा (३१), जैब अहमद (१९) आणि प्रमित मुखर्जी उर्फ प्रमित मुखोपाध्याय (२०) अशी त्यांची नावे आहेत.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आणि २६ जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी तिन्ही आरोपींचे मोबाइल फोनही जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपींच्या कुटुंबीयांनाही बोलावून त्यांच्याकडे चौकशी केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.