राष्ट्रीय

किरकोळ वादातून LIC एजंटची गोळ्या झाडून हत्या, आरोपी मित्राला नेपाळ सीमेवरून अटक

आरोपी मित्र परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

Suraj Sakunde

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात एका एलआयसी एजंटची गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या मित्रानंच किरकोळ वादातून त्याची हत्या केल्याचं उघड झालं आहे. दरम्यान आरोपी मित्र परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

या घटनेची माहिती देताना बलरामपूर जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) विकास कुमार यांनी सांगितले की, "मोहम्मद वसीम असे मृताचे नाव आहे. तो एलआयसी एजंट म्हणून काम करत होता. बुधवारी त्याचा मित्र फरहानने त्याला भेटण्यासाठी बोलावले होते. वसीम जेव्हा त्याचा मित्र फरहानकडे पोहोचला तेव्हा त्यांच्यात काही मुद्द्यांवरून वाद सुरू झाला. काही वेळाने हाणामारी झाली आणि यादरम्यान फरहानने वसीमवर गोळी झाडली. गोळी लागताच रक्तस्त्राव होऊ लागला आणि तो जमिनीवर पडला."

एसपी विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हल्ल्यानंतर आरोपी फरहान घटनास्थळावरून पळून गेला. गोळीचा आवाज ऐकून तेथे लोक जमा झाले आणि जखमी वसीमला रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वसीमच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला."

गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तातडीनं कारवाईला सुरुवात केली आणि आरोपी फरहानचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिसांना खबऱ्यांकडून आरोपीची माहिती मिळाली आणि पोलिसांच्या पथकाने आरोपी फरहानला नेपाळ सीमेवरील माझगवा पोलिस चौकीतून अटक केली. तो नेपाळला पळून जाण्याचा विचार करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक (एसपी) विकास कुमार म्हणाले की, "आता या प्रकरणाचा सविस्तर तपास केला जात आहे. या हत्येमागचे कारण अद्याप पोलिसांना सापडलेले नाही."

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video