राष्ट्रीय

काश्मीरमध्ये मतदानापूर्वी दहशतवादी हल्ले; भाजप कार्यकर्त्याची हत्या

Swapnil S

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान आणि अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी उशिरा झालेल्या दुहेरी दहशतवादी हल्ल्यात भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता ठार झाला आणि राजस्थानमधील पर्यटक जोडपे जखमी झाले. तसेच पूंछ जिल्ह्यातील मेंढर येथे रविवारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या रॅलीत झालेल्या चाकूहल्ल्यात तीन कार्यकर्ते जखमी झाले.

शनिवारी रात्री शोपियान जिल्ह्यात भाजप कार्यकर्ता आणि माजी सरपंच एजाज अहमद शेख यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात शेख यांचा मृत्यू झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच भाजपच्या अनेक नेत्यांना दहशतवाद्यांच्या धमक्या मिळत असूनही स्थानिक प्रशासन त्यांना सुरक्षा पुरवण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोपही केला. शोपियानमधील हिरपोरा येथे रविवारी शेख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजस्थानी दाम्पत्यावर हल्ला

जयपूर येथील तबरेज खान आणि फरहा हे दाम्पत्य त्यांच्या दोन मुलांसह जम्मू-काश्मीरला भेट देण्यासाठी गेले होते. शनिवारी रात्री अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी रविवारी सरकारी अधिकाऱ्यांना जम्मू-काश्मीरमधील गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या जयपूरच्या दाम्पत्याला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ते जखमी

नॅशनल कॉन्फरन्सचे अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मियां अल्ताफ यांच्या समर्थनार्थ रविवारी पूंछ जिल्ह्यामधील मेंढहर येथे रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यात नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला हेदेखील उपस्थित होते. रॅलीत दोन गटांमध्ये काही कारणावरून वाद झाला. नंतर वाद वाढत जाऊन हाणामारी झाली. त्याचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केला. त्यात नॅशनल कॉन्फरन्सचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. हर्णीचे रहिवासी सोहेल अहमद आणि यासीर अहमद, तसेच कसबलारी गावचे मोहम्मद इम्रान अशा तिघांना चाकूने दुखापत झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. हाणामारीचा फायदा घेत हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस