लखनऊ : उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत समझोता झाला आहे. आता काँग्रेसच्या वाट्याला उत्तर प्रदेशात १७ जागा आल्या आहेत. समाजवादी पार्टी उर्वरित ६३ जागा लढविणार आहे. या समझोत्यामुळे इंडिया आघाडीतील सपा व काँग्रेस यांच्यातील जागावाटपाबद्दलचा प्रश्न सुटला आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमधील लोकसभा निवडणुकीतील इंडिया आघाडीतील या जागावाटपानुसार मध्य प्रदेशात सपा खजुराहो येथील एकच जागा लढविणार आहे व उर्वरित सर्व ठिकाणी ते काँग्रेसला पाठिंबा देतील तर उत्तर प्रदेशात ९० पैकी १७ जागी काँग्रेस निवडणूक लढविणार आहे.
उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी तसेच वाराणसीसह १७ जागा काँग्रेसच्या पदरी पडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आता काँग्रेसचा उमेदवार उभा राहणार आहे.
सपा प्रदेश प्रमुख नरेश उत्तम पटेल, सपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र चौधरी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि यूपीचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांनी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत ही जागावाटपाची घोषणा केली. पांडे म्हणाले की, काँग्रेस १७ तर उर्वरित ६३ जागांवर सपा आणि इतर आघाडीचे भागीदार निवडणूक लढवतील. रायबरेली, अमेठी आणि वाराणसी व्यतिरिक्त काँग्रेस ज्या जागांवर लढणार आहे त्यात कानपूर सिटी, फतेहपूर सेकरी, बसगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी आणि देवरिया, पटेल यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी सध्या रायबरेलीच्या खासदार आहेत तर राहुल गांधींना २०१९ च्या निवडणुकीत भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याकडून अमेठीची जागा गमवावी लागली होती.
लोकसभेच्या २९ जागा असलेल्या मध्य प्रदेशातील खजुराहो जागेवर सपा निवडणूक लढवेल आणि उर्वरित जागांवर काँग्रेसला पाठिंबा देईल, असे पटेल यांनी नमूद केले. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते युतीचे भविष्यातील कार्यक्रम ठरवतील, असेही ते म्हणाले.
अखिलेश यादवही होते आशादायी
या आधी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेस व समाजवादी पार्टी यांच्यात युती होईल, असे स्पष्ट केले होते. त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत जागावाटपाच्या प्रस्तावाला स्कीकारल्यानंतर त्यात सहभागी होऊ असे यादव यांनी सांगितले. मंगळवारी ते रायबरेली येथे यात्रेत सहभागी झाले नव्हते.
प्रियंका गांधींची मध्यस्थी यशस्वी
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी बुधवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरील कोंडी फोडण्यासाठी आणि युतीला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.