मुलीच्या प्रेमाला वडिलांचा विरोध; आईनेच रचला पतीच्या हत्येचा कट, मुलगी आणि प्रियकरही सहभागी 
राष्ट्रीय

मुलीच्या प्रेमाला वडिलांचा विरोध; आईनेच रचला पतीच्या हत्येचा कट, मुलगी आणि प्रियकरही सहभागी

पतीला आधी झोपेचे औषध घातलेले दूध देण्यात आले. तो झोपल्यानंतर त्याच्यावर लोखंडी मुसळाने हल्ला करण्यात आला. त्यानंतर मृतदेह जंगलात...

Mayuri Gawade

मथुरा : मुलीच्या प्रेमसंबंधाला वडिलांचा विरोध होता. याच रागातून एका महिलेने आपल्या मुलीसोबत आणि तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मथुरा येथे समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पतीला आधी झोपेचे औषध घातलेले दूध देण्यात आले. तो झोपल्यानंतर त्याच्यावर लोखंडी मुसळाने हल्ला करण्यात आला. त्यानंतर मृतदेह जंगलात नेऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी (दि.०८) महिला, तिची अल्पवयीन मुलगी आणि मुलीच्या प्रियकराला अटक केली आहे.

मुलीच्या प्रेमसंबंधाला वडिलांचा विरोध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव मनोज सोनी (४२) असून ते मथुरेतील गणेश धाम कॉलनीत राहत होते. त्यांची पत्नी नयना सोनी (४०) आणि अल्पवयीन मुलगीही त्यांच्यासोबत राहत होती. मनोज यांच्या मुलीचे विमल चौधरी नावाच्या डिलिव्हरी बॉयसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, मनोज यांचा या नात्याला विरोध होता. यावरून घरात अनेकदा वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दूधात औषध मिसळलं, झोपल्यानंतर हल्ला

पोलिसांच्या चौकशीत नयनाने दिलेल्या कथित माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी मनोज यांना झोपेचे औषध मिसळलेले दूध देण्यात आले. दूध प्यायल्यानंतर मनोज झोपले. यानंतर नयना, तिची अल्पवयीन मुलगी आणि विमल यांनी मिळून मनोज यांच्यावर लोखंडी मुसळाने वार केल्याचा आरोप आहे. मनोज यांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळण्यात आला.

स्कूटरवरून मृतदेह जंगलात नेला

पोलिसांच्या माहितीनुसार, मनोज यांचा मृतदेह स्कूटरवरून अक्रूर गावाजवळील यमुनेच्या परिसरातील जंगलात नेण्यात आला. तिथे मृतदेह जाळून त्याचे अवशेष नदीजवळ पुरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, यमुनेची पाणीपातळी वाढल्याने पोलिसांना मृतदेहाचे अवशेष शोधण्यात अडचणी येत आहेत. पोलिसांकडून जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.

मृतदेह सापडलेला नाही; पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणात पोलिसांना घटनास्थळावरून ब्लँकेट, मृतदेह नेण्यासाठी वापरल्याचा संशय असलेली स्कूटर तसेच जाळलेल्या कपड्यांचे आणि कागदपत्रांचे अवशेष मिळाले आहेत. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

मात्र, अद्याप मनोज यांचा मृतदेह सापडलेला नसल्याने सध्या पोलिसांनी हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याच्या कलमांतर्गत तपास सुरू केला आहे. मृतदेह किंवा इतर ठोस पुरावे मिळाल्यानंतर या प्रकरणात हत्येचे कलम जोडले जाऊ शकते.

दोन महिन्यांनी समोर आली घटना

मनोज हे १८ एप्रिलनंतर बेपत्ता झाले होते. त्यांचे मोठे भाऊ रामबाबू यांनी ११ जुलै रोजी बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली. मनोज, त्यांची पत्नी आणि अल्पवयीन मुलगी अचानक गायब झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान नयना आणि तिची मुलगी पोलिसांच्या संशयाच्या भोवऱ्यात आल्या. त्यानंतर मनोज यांच्या मुलीचे विमलसोबत असलेले संबंध आणि मनोज यांचा त्याला असलेला विरोध समोर आला. ७ ऑगस्ट रोजी रामबाबूंनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(१) अंतर्गत तक्रार दाखल केली. तपास पुढे गेल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

आईला न्यायालयीन कोठडी, मुलीची रवानगी बालगृहात

पोलिसांनी नयना सोनी, तिची अल्पवयीन मुलगी आणि विमल चौधरी या तिघांना अटक केली आहे. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर नयनाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर अल्पवयीन मुलीची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून जंगल परिसरात मनोज यांचे अवशेष शोधण्यासोबतच या संपूर्ण कटामागे नेमकी काय भूमिका होती, याचाही तपास सुरू आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

Mumbai : ॲॅक्वा मेट्रोतून ७.२ कोटी जणांचा प्रवास; वर्षभरात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

Thane : आयोग बदला, निवडणूक वाचवा! ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळे यांची मागणी

कर अधिकाऱ्यांचे अटकेचे अधिकार अखेर रद्द; जीएसटी परिषदेची करदात्यांसाठी जलद परताव्यालाही मंजुरी

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग