चेन्नई : मी काशीचा खासदार आहे. जेव्हा मी ‘ॐ नमः शिवाय’ ऐकतो, तेव्हा अंगावर रोमांच उठतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
महान चोल सम्राट राजेंद्र चोल (प्रथम) यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी हे गंगईकोंडा चोलपुरम मंदिरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले की, ही राजाची श्रद्धा भूमी आहे. संगीतकार इलय्याराजा यांनी आपल्या सगळ्यांना ‘शिवभक्ती’त तल्लीन केले. काय अद्भूत वातावरण होते. चोल साम्राज्याच्या काळात भारत हा सुवर्ण युगात राहत होता, असे इतिहासकार म्हणतात. चोल साम्राज्याने भारताला लोकशाहीची जननी म्हणण्याची परंपरा पुढे नेली. इतिहासकार लोकशाही म्हटल्यावर ब्रिटनच्या ‘मॅग्ना कार्टा’ची चर्चा करतात. पण, अनेक शतकांपूर्वी चोल साम्राज्यात लोकशाही पद्धतीने निवडणुका होत होत्या. आपण अनेक राजांबाबत ऐकतो की, ते दुसऱ्या ठिकाणी विजय मिळवल्यावर सोने, चांदी, पशुधन आणत होते, तर राजेंद्र चोल हे गंगेचे पाणी घेऊन आले, असे मोदी म्हणाले.
गंगईकोंडा मंदिराचा इतिहास
गंगईकोंडा चोलपुरम मंदिर तमिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात वसले आहे. ते ११ व्या शतकात चोल सम्राट राजेंद्र चोल (प्रथम) यांनी बांधले. हे मंदिर ‘युनेस्को’च्या जागतिक पुरातन वारसा यादीत मोडते. हे मंदिर भगवान शंकराचे आहे. या मंदिराचे मुख्य गर्भगृह ५५ मीटर उंच असून त्यात १३.५ फूट उंच शिवलिंग आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या शिवलिंगापैकी ते एक आहे. या मंदिराची वास्तुकला द्रविड आहे. हे मंदिर चोल साम्राज्याची राजधानी म्हणून २५० वर्षे राहिले. याचे काम १०३५ मध्ये पूर्ण झाले. मंदिरात नंदी मंडप, अलंकार मंडप, महामंडप आदी मंडप होते. या मंदिरात चारवेळा पूजा होते. महाशिवरात्रीला वार्षिक उत्सव होतो. पर्यटकांसाठी हे मंदिर सकाळी ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत, तर सायंकाळी ४ ते रात्रौ ९ वाजेपर्यंत उघडे असते.