गांधीनगर : भारताविरोधात थेट लढाई जिंकू शकत नाही याची पाकिस्तानला चांगलीच जाणीव असल्याने दहशतवाद्यांना भारतात पाठवले जाते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर मंगळवारी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. गुजरात दौऱ्यावरील दुसऱ्या दिवशी गांधीनगरच्या महात्मा मंदिरात ५,५३६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन मोदी यांनी केले, त्यावेळी त्यांनी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांवर निशाणा साधला.
जाणीवपूर्वक रणनीती
दहशतवादाच्या आडून पाकिस्तान युद्ध पुकारत आहे, पाकिस्तान दहशतवादाला पोसत आहे. ते छुपे युद्ध नाही तर ती जाणीवपूर्वक आखलेली रणनीती आहे, मात्र भारत त्याला सडेतोड प्रत्युत्तर देईल, असा इशारा मोदी यांनी मंगळवारी येथे पुन्हा एकदा पाकिस्तानला दिला. आम्ही याला छुपे युद्ध म्हणणार नाही. कारण ६ मे रोजी भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले त्यामध्ये जे मारले गेले त्यांना पाकिस्तानात सन्मान दिला गेला. त्यांच्या शवपेट्यांवर पाकिस्तानचा झेंडा गुंडाळण्यात आला होता, तसेच त्यांना लष्कराने सलामीही दिली, असे मोदी म्हणाले.
या सर्व घटनांवरून हेच स्पष्ट होते, की हे छुपे युद्ध नाही तर ही जाणीवपूर्वक आखण्यात आलेली रणनीती आहे. जर त्यांनी युद्ध पुकारलेच तर त्याला भारत आपल्या पद्धतीने सडेतोड प्रत्युत्तर देईल. जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तेव्हा भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानचा पराभव केला, शेजारी देश हे कधीही विसरू शकणार नाही, असे ते म्हणाले.
सरदार पटेल त्याचवेळी पीओके ताब्यात घेणार होते
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल आग्रही होते. जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत लष्करी कारवाई थांबविण्यात येऊ नये, असे पटेल यांचे मत होते. पण त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याची त्यावेळी महत्त्वाची संधी गमावली. त्यांच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही आणि आता ७५ वर्षांनंतरही आपण दहशतवादाचा सामना करत आहोत. पहलगाम हे त्याचेच एक उदाहरण आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
भूभाग बळकावला
आपण भारताशी थेट युद्ध जिंकू शकत नाही याची जाणीव असल्याने त्यांनी छुप्या युद्धाचा मार्ग अवलंबिला आहे आणि त्यासाठीच दहशतवाद्यांना लष्करी प्रशिक्षण आणि पाठिंबा ते देत आहेत. एक काटाही सततच्या वेदना देतो. त्यामुळे तो काटाच काढून टाकण्याचे आम्ही ठरविले आहे. फाळणीच्या पहिल्याच रात्री काश्मीरवर मुजाहिद्दीनांकडून पहिला दहशतवादी हल्ला झाला आणि पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मदतीने भारतमातेचा एक भूभाग बळकावला, असेही मोदी म्हणाले.