(फोटो सौजन्य : X/@JagdishDevdaBJP)
राष्ट्रीय

"संपूर्ण देश, देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत" ; MP च्या उपमुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरुन अद्याप वाद शमलेलाही नसताना आता मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान समोर आलं आहे.

Krantee V. Kale

मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरुन अद्याप वाद शमलेलाही नसताना आता मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान समोर आलं आहे. जबलपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, "संपूर्ण देश, देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत," असे जगदीश देवडा म्हणाले.

जगदीश देवडा गुरूवारी जबलपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना ते म्हणाले, "तिथे गेलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून निवडकपणे मारण्यात आले, याचा मनात खूप राग होता. महिलांना बाजूला उभे करून त्यांच्यासमोर गोळ्या घालण्यात आल्या. मुलांसमोर गोळ्या घातल्या. त्या दिवसापासून संपूर्ण देशवासियांच्या मनात चीड होती की जोपर्यंत मातांचे सिंदूर पुसण्याचे काम करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना मारुन बदला घेतला जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही...आणि आम्ही यशस्वी पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो. संपूर्ण देश, देशाचे सैन्य, सैनिक त्यांच्या चरणी नतमस्तक आहेत. त्यांनी ज्याप्रकारे उत्तर दिले त्याचे करावे तितके कौतुक कमी आहे...कृपया त्यांच्यासाठी टाळ्यांचा मोठा कडकडाट करा".

तातडीने राजीनामा घ्या, कोणत्याच पदावर ठेवू नका

देवडा यांच्या या विधानामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने हा भारतीय सैन्याचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. जगदीश देवडा यांचे विधान लज्जास्पद आहे. हा सैन्याच्या शौर्याचा आणि धाडसाचा अपमान आहे. यावेळी माफी मागून आणि खेद व्यक्त करुन विषय संपणार नाही. भारतीय सैन्याबाबत इतके वाईट विचार मनात असलेल्या व्यक्तीला कोणत्याच पदावर ठेवू नये, त्यांचा तातडीने राजीनामा घेतला जावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

दरम्यान, कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्याविरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या ‘एफआयआर’च्या भाषेवरून हायकोर्ट गुरुवारी संतप्त झाले. याप्रकरणी तपशीलवार ‘एफआयआर’ लिहा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. पोलिसांनी लिहिलेल्या ‘एफआयआर’ला आव्हान दिल्यास तो तत्काळ रद्द करता येऊ शकेल, अशी त्यातील भाषा आहे. या ‘एफआयआर’मध्ये तपशीलवार गुन्ह्याचे स्वरूप लिहा. तसेच या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे करावा, असे न्यायालयाने पोलिसांना बजावले.

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण! ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम, पुढील ४८ तास महत्त्वाचे

Navi Mumbai : पाडकाम रोखण्यासाठी कोर्टाचा बनावट आदेश बनवला; न्यायाधीशांचीच केली हुबेहूब खोटी सही, CBD पोलिसांत गुन्हा दाखल

बदलापूर-वांगणी रस्ता मृत्यूचा सापळा? सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Devgad : कोकणात विनाशकारी प्रकल्प नकोच..! मुणगे ग्रामसभेत तीव्र आंदोलनाचा इशारा

प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट; मुख्यमंत्र्यांची घोषणा