नवी दिल्ली: काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी 'नारीशक्ती वंदन' विधेयकाला विरोध करत महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली आहे. ज्या-ज्या पक्षांनी महिलांच्या आरक्षणामध्ये अडथळे आणले त्यांना भविष्यात परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. या पक्षांनी महिला आरक्षणाला विरोध करत त्यांचा खरा चेहरा समोर आणला, असेही मोदी म्हणाले.
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना संबंधित १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करत आपली भूमिका मांडली. काँग्रेसने इतिहास रचण्याची आणि महिलांच्या बाजूने उभे राहण्याची संधी गमावली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, आज भलेही हे विधेयक पास करण्यासाठी ६० टक्के बहुमत आमच्याकडे नसेल, परंतु देशातील कोट्यवधी महिलांची आम्हाला साथ आहे. महिलांच्या अधिकारांमध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणी आम्ही दूर करू. आमचा विश्वास दृढ आहे. आम्ही फक्त त्या वेळेची वाट पाहतोय. काल आमच्याकडे संख्याबळ नाही म्हणजे आमचा पराभव झाला असे नाही. आमचा प्रयत्न थांबणार नाही. आमच्याकडे पुढे अनेक संधी येतील आणि आम्ही हा संकल्प पूर्ण करूच, असा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला.
ज्यावेळी महिलांच्या अधिकारांवर गदा येते त्यावेळी त्याचा बदला घेतला जाईल. 'नारीशक्ती वंदन' विधेयकाला ज्या लोकांनी विरोध केला, त्यांनी महिलांना गृहीत धरण्याची चूक केली. देशातील महिलांना विरोधकांची भूमिका समजली आहे. त्याचे परिणाम आता भोगावे लागणार आहेत. 'नारीशक्ती वंदन बिल' हे प्रत्येकाला काहीतरी देणारे होते, कुणाचेही काहीही काढून घेणारे नव्हते. गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेले ते बिल होते. या माध्यमातून एकविसाव्या शतकातील महिलांना नवीन संधी देणारे आणि त्यांच्या वाटेतील अडचणी दूर करणारे होते. देशातील अर्ध्या लोकसंख्येला त्यांचा अधिकार देणारा तो प्रयत्न होता.
मतदारसंघ पुनर्रचनेमुळे महिलांची संख्या वाढणार होती
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे महिलांच्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघांमध्ये मोठी वाढ होणार होती. परंतु काँग्रेसला ते नको असल्याने त्याला विरोध करण्यात आला. काँग्रेसने 'फोडा आणि राज्य करा' हे सूत्र इंग्रजांपासून घेतले आणि त्याचाच वापर त्यांनी यावेळी केला. मतदारसंघ पुनर्रचनेवर काँग्रेस आणि टीएमसी, डीएमके, समाजवादी पक्षाने सातत्याने अफवा पसरवल्या. या विधेयकाच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या संसदेतील प्रतिनिधित्वामध्ये समान वाढ होणार होती. परंतु, विरोधकांच्या विरोधामुळे हे होऊ शकले नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.
डीएमकेला मोठी संधी होती, या विधेयकामुळे अधिक तामिळ लोक हे संसदेत आले असते. परंतु डीएमकेने त्याला विरोध केला. समाजवादी पक्षाने तर राम मनोहर लोहिया यांच्या विचारसरणीचा कधीच त्याग केला आहे. त्यामुळे या सर्वांनी मिळून महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध केला.
काँग्रेसचे नकारात्मक राजकारण
काँग्रेस सातत्याने नकारात्मक राजकारण केले. याच काँग्रेसने जनधन, आधार, डिजिटल पेमेंट यासह तिहेरी तलाक, कलम ३७० हटवण्याला विरोध केला. समान नागरी आचारसंहितेला काँग्रेसने विरोध केला. सुधारणांचे नाव ऐकताच काँग्रेस विरोधाच्या भूमिकेत जाते. देशाला बळकटी देण्याच्या प्रत्येक प्रयत्नात काँग्रेसने विरोध केला. त्यांनी 'एक देश, एक निवडणूक'ला विरोध केला. त्याचसोबत सर्वच सुधारणांना काँग्रेसने खोटे बोलत विरोध केला, असे ते म्हणाले.
महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर
भारतीय महिलांच्या इच्छांना रोखण्यात आले, त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्यात आला. आमच्यासाठी देशहित सर्वात प्रथम आहे. पण काही लोकांसाठी पक्षहित हे सर्वात मोठे होते. त्यावेळी देशातील महिलांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. यावेळीही असेच काहीतरी झाले. कॉग्रेस, समाजवादी, डीएमके यांच्यामुळेही आता असेच घडले. देशातील कोट्यवधी महिला संसदेकडे डोळे लावून बसल्या होत्या. ज्यावेळी महिलांच्या हितासंबंधी संसदेत प्रश्न उपस्थित झाला आणि त्यांच्या अधिकारांवर गदा आली, त्यावेळी काँग्रेससारखे परिवारवादी पक्ष टाळ्या वाजवत होते.