निवडणूक आयोगाच्या बचावासाठी सत्ताधारी सरसावले; एनडीएचा विरोधकांवर हल्लाबोल 
राष्ट्रीय

निवडणूक आयोगाच्या बचावासाठी सत्ताधारी सरसावले; एनडीएचा विरोधकांवर हल्लाबोल

मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजाबाबत निवडणूक आयोगातीलच दोन सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली होती.

Swapnil S

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजाबाबत निवडणूक आयोगातीलच दोन सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या बचावासाठी सत्ताधारी पुढे सरसावले असून एनडीए आणि घटक पक्षातील प्रमुख नेत्यांनी विरोधकांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे.

पश्चिम बंगालमधील भाजपचा विजय अजूनही पचनी न पडलेली काही प्रसारमाध्यमे निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) या प्रक्रियेबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. आमच्या राज्यातील एसआयआर प्रक्रियेदरम्यान २७ लाख नावे वगळण्यास भाजप किंवा निवडणूक आयोग नव्हे, तर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार होत्या, असा आरोप पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.

विरोधकांकडून जनतेची दिशाभूल -रेखा गुप्ता

निवडणूक आयोगाच्या कामकाजावर सातत्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रविवारी जोरदार हल्लाबोल केला. देशात फक्त जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने काही घटक विशिष्ट परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या विरोधक मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित करत आहेत; मात्र ज्या राज्यांमध्ये विरोधकांची सत्ता होती, तिथे अशा प्रकारची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व पाहायला मिळाले होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधींकडून घटनात्मक संस्थांचा अपमान - योगी आदित्यनाथ

निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आणि कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी जोरदार टीका केली. “निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर विरोधी पक्ष त्याला स्वतःचा पुरुषार्थ सांगतात, मात्र पराभव पदरी पडताच ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करतात. विरोधकांच्या या अशा भूमिकेमुळे देशातील स्वायत्त आणि लोकशाही संस्थांचे मोठे नुकसान होत आहे. राहुल गांधी प्रत्येक घटनात्मक संस्थेला सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे काम करत आहेत. त्यांची ही कृत्ये केवळ देशांतर्गत मर्यादित नसून, परदेशात जाऊनही ते भारताची बदनामी करत आहेत,” असे आदित्यनाथ यांनी सांगितले.

विरोधकांचे दुटप्पी धोरण -एकनाथ शिंदे

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार निशाणा साधला. काँग्रेस ज्या वेळी निवडणुका जिंकते, त्या वेळी ती निवडणूक आयोगावर कोणताही हल्ला करत नाही. काँग्रेस आणि तिचे मित्रपक्ष केवळ निवडणुका हरल्यानंतरच निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करतात, असे ते म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

एल निनो संकट तीव्र होणार; पुढील वर्षाचीही तयारी करावी लागेल, फडणवीसांचा इशारा

१ ऑक्टोबरपासून AC, TV महागणार; ५ ते ८ टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता

मुंबईत पाणीकपात कायम; BMC चा निर्णय, धरणात ९७ टक्के पाणीसाठा

अशोकजी सिंघल : एक राष्ट्रऋषी

मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ!