राष्ट्रीय

नेहरु आरक्षणविरोधी 'पंतप्रधान मोदी यांचा आरोप': काँग्रेसची विचारसरणी आता कालबाह्य

Swapnil S

नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सरकारी नोकरीतील आरक्षणाला विरोध होता, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेतील भाषणावेळी केला. यावेळी मोदींनी नेहरूंचे आरक्षणाला विरोध असल्याचे पत्रच पुरावा म्हणून सादर केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आभार प्रदर्शनानिमित्त ते राज्यसभेत भाषण करत होते. मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेसने आपले काम करण्यासाठी नेहमीच बाहेरील सहाय्य घेतले. या पक्षाच्या अधोगतीबद्दल मला सहानुभूती वाटते. काँग्रेसची विचारसरणी आता कालबाह्य ठरली असून आपले काम त्यांनी बाहेरच्या सहकार्यातून केले. या पक्षाच्या वाताहतीचे आम्हाला दु:ख झाले असून आमची त्यांना सहानुभूती आहे. काँग्रेसने सत्तेसाठी लोकशाहीचा गळा घोटला आणि वेळोवेळी लोकशाही मार्गाने स्थापन झालेली सरकारे बरखास्त केली. काँग्रेस आता देशाचे उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे दोन तुकडे पाडू इच्छित आहे. तसा भाव जनमानसात ते तयार करत आहेत. तसेच काँग्रेसने मोठा भूभाग शत्रू देशांच्या घशात घातला आहे. आता हेच लोक आम्हाला अंतर्गत सुरक्षिततेचे उपदेश देत आहेत.’’

मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेस नेहमीच दलित, मागासवर्गीय, भटक्या जमाती यांच्या विरोधात होते. बाबासाहेब आंबेडकर नसते तर या वर्गांना कधीही आरक्षण मिळाले नसते. या पक्षाला स्वत:च्याच नेत्यांची व धोरणांची गॅरंटी नाही.

मात्र, मोदींच्या गॅरंटीवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. काँग्रेसला देशासमोरील समस्या माहीत होत्या, पण त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. आम्ही कठीण काळावर मात करुन देशाला समस्यांमधून बाहेर काढले आहे. काँग्रेस ब्रिटिशांकडून प्रेरित झाला होता म्हणून तर अनेक दशके त्यांनी गुलामीची प्रतिके तशीच राहु दिली.’’

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला या चार गटांच्या समस्या सोडवण्याबाबत भाष्य केले आहे. काँग्रेसने असे काही भाव निर्माण केले की ज्यामुळे भारतीय परंपरांकडे जग खालच्या नजरेने पाहू लागले, अशी टिप्पणी देखील पंतप्रधान मोदी यांनी आपल्या या आभार प्रदर्शनाच्या भाषणादरम्यान केली.

काँग्रेस नेहमीच मागासवर्गीय, भटक्या जमातीच्या विरोधात होते. बाबासाहेब नसते तर या वर्गांना कधीही आरक्षण मिळाले नसते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस