राष्ट्रीय

IPO आक्रसणार; एनएसईसाठी भागधारकांनी घेतली माघार; सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम हुकणार

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या प्रस्थापित भागधारकांनी ऑफर फॉर सेल (ओएफएस) मधून माघार घेतल्यामुळे, एनएसईच्या आयपीओचा आकार ५.२ ते ५.५ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. यापूर्वी हा हिस्सा ६ टक्के विकण्याचे नियोजित होते. याबाबतची माहिती घडामोडींशी परिचित सूत्रांनी बुधवारी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या प्रस्थापित भागधारकांनी ऑफर फॉर सेल (ओएफएस) मधून माघार घेतल्यामुळे, एनएसईच्या आयपीओचा आकार ५.२ ते ५.५ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. यापूर्वी हा हिस्सा ६ टक्के विकण्याचे नियोजित होते. याबाबतची माहिती घडामोडींशी परिचित सूत्रांनी बुधवारी दिली. ओएफएसचा आकार घटल्यामुळे आयपीओचा एकूण आकार ₹ २५,००० ते ₹ २७,००० कोटीपर्यंत खाली येऊ शकतो. तो आधी ₹३०,००० कोटींचा अपेक्षित होता. या आकारमानामुळे एनएसईचा आयपीओ हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्यापासून मुकू शकतो. सध्या ह्युंदाई मोटर इंडियाचा ₹ २७,८७० कोटींचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ आहे.

  • सुधारित प्राइस बँड : आयपीओचा किंमत पट्टा प्रति शेअर ₹१,७०० ते ₹१,७८५ दरम्यान असण्याची शक्यता आहे. यापूर्वी तो ₹२,००० प्रति शेअर राहण्याचा अंदाज होता.

  • महत्त्वाच्या तारखा : एनएसईचा आयपीओ १८ सप्टेंबर रोजी खुला होऊन २२ सप्टेंबर रोजी बंद होण्याची शक्यता आहे. २५ सप्टेंबर रोजी शेअर बाजारात शेअर्सची नोंदणी होण्याची शक्यता आहे. २६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 'पितृ पंधराव्या'पूर्वी ही लिस्टिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

  • जिओशी स्पर्धा : एनएसईच्या या आयपीओची थेट स्पर्धा उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या संभाव्य आयपीओशी असेल. जिओच्या आयपीओचा आकार ₹३७,७०० कोटी अंदाजित आहे, मात्र त्याच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

नियामक मंजुरी आणि प्रमुख भागधारक

गेल्या आठवड्यातच भांडवल बाजार नियामक 'सेबी'ने एनएसईला सार्वजनिक भागविक्रीसाठी हिरवा कंदील दिला. को-लोकेशन प्रकरणासह विविध कायदेशीर व नियामक अडचणींमुळे गेली १० वर्षे रखडलेल्या एनएसईच्या लिस्टिंग प्रक्रियेसाठी ही मंजुरी महत्त्वाची ठरली आहे.

एनएसईने जून महिन्यात सेबीकडे मसुदा दाखल केला होता. परंतु, विक्री करणाऱ्या भागधारकांच्या यादीत एसबीआय कॅपिटल मार्केट्सचा समावेश झाल्याने पुन्हा २१ दिवसांची हरकती व सूचनांची मुदत द्यावी लागली. यामुळे प्रक्रियेला उशीर झाला.

मसुद्यानुसार हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (ओएफएस) स्वरूपाचा आहे. यामध्ये १४.८९ कोटी शेअरची विक्री केली जाईल. संपूर्ण आयपीओ ओएफएस स्वरूपाचा असल्याने यातून मिळणारा निधी एक्सचेंजकडे न जाता शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना मिळेल.

प्रमुख विक्री करणारे भागधारक

स्टेट बँक ऑफ इंडिया : २.४८ कोटी शेअर्सपर्यंत विक्री करणार

एमएस स्ट्रॅटेजिक (मॉरिशस) लिमिटेड : १.६० कोटी शेअर्स

इतर प्रमुख संस्था : कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड, अरंदा इन्व्हेस्टमेंट्स (मॉरिशस), बँक ऑफ बडोदा, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जनरल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (जीआयसी), द न्यू इंडिया अश्युरन्स, नॅशनल इन्श्युरन्स आणि युनायटेड इंडिया इन्श्युरन्स.

भागधारकांच्या निर्णयामागील कारणे

काही भागधारकांनी आयपीओ दरम्यान शेअर्स न विकण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे जाऊन कंपनीचे मूल्यांकन आणखी सुधारेल आणि नंतरच्या टप्प्यात चांगला भाव मिळेल, असा विश्वास या भागधारकांना वाटत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.याव्यतिरिक्त, एनएसई किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी या आयपीओची रचना अधिक सुलभ करत आहे. लहान गुंतवणूकदारांचा सहभाग वाढावा आणि त्यांना अधिक फायदा मिळावा, यादृष्टीने शेअरच्या किमती निश्चित केल्या जात आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

हिंदू-वाणी, हिंदू-वैश्य हे वैश्यवाणीच; नोंदींच्या आधारे जात, वैधता प्रमाणपत्र देणार

पार्थ पवार यांना आरोपी का केले नाही? मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

Mumbai : गणेशोत्सवात विद्यापीठाचे दीड हजार ‘सारथी’; NSS चे विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला

Women Asia Cup 2026 : भारतीय महिला संघाचा आज बांगलादेशशी उपांत्य सामना; दुसऱ्या लढतीत पाकिस्तान-श्रीलंका आमनेसामने

CJP आंदोलकाला नोटीस; सरन्यायाधीशांनी दंडाधिकाऱ्यांना फटकारले