हजारीबाग : झारखंडच्या हजारीबाग येथे दुचाकीवरून आलेल्या दोन बंदुकधाऱ्यांनी एनटीपीसीच्या अधिकाऱ्याची शनिवारी गोळ्या घालून हत्या केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हजारीबागचे पोलीस अधीक्षक अरविंद कुमार सिंग म्हणाले की, एनटीपीसीच्या केरेदरी कोळसा खाण प्रकल्पात कुमार गौरव हे महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. गौरव हे कोळसा खाणीवर निघाले असताना सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास गौरव यांच्या कारचा बंदुकधाऱ्यांनी पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
या हत्येच्या तपासासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी पवन कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. तसेच या हत्येच्या सूत्रधारांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.