अयोध्या : अयोध्येतील नवीन राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीवर बुधवारी रामनवमीच्या दिवशी प्रथमच सूर्यकिरणांचा अभिषेक घडला. बुधवारी दुपारी १२ वाजता अभिजित मुहूर्तावर ३ मिनिटे रामलल्लाच्या ललाटावर सूर्यकिरणे चमकली. पहाटेच्या सुमारास येथील राम मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक प्रशासन आणि मंदिर प्रशासनाने रामनवमीच्या दिवशी गर्दी हाताळण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. रामलल्लाला सूर्यतिलक होताच गर्भगृहाबाहेरील भक्तांनी ‘जय श्री राम’चा जयघोष केला. पुरोहितांनी देवाची आरती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घटना संगणकावरून पाहिली आणि रामलल्लाला वंदन केले. आरसे आणि भिंगांचा समावेश असलेल्या विशेष उपकरणामुळे रामलल्लाचा किरणाभिषेक शक्य झाला. हे उपकरण सूर्यकिरणे मंदिराच्या गर्भगृहात आणि मूर्तीच्या कपाळावर निर्देशित करते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, बंगळुरू आणि सीएसआयआर-सीबीआरआय, रुरकी यांनी एकत्रितपणे हे उपकरण तयार केले आहे. त्यांनी मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरून 'गर्भ गृहा'पर्यंत सूर्यप्रकाश वाहून नेणारी यंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा १९ वर्षे काम करेल.