File Photo
राष्ट्रीय

विरोधकांना सूर गवसला; ‘राज्यघटना वाचवा‘: इंडिया आघाडीचा पहिल्याच दिवशी संसदेत नारा

Swapnil S

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. निवडणुकीत जनतेकडून चांगले पाठबळ मिळाल्याने प्रबळ बनलेल्या विरोधकांनी आपण ‘राज्यघटना’ वाचवण्यासाठी जोरकसपणे प्रयत्न करणार असल्याचे सूचित केले. पहिल्याच दिवशी शपथविधीच्या वेळी ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी ‘राज्यघटना’ हातात ठेवून मोदी सरकारला सूचक इशारा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे खासदारकीची शपथ घेत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘राज्यघटने’ची प्रत दाखवली. संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी हातात ‘राज्यघटना’ हाती घेऊन इंडिया आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केले. सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील खासदार या आंदोलनात सहभागी झाले होते.

हंगामी अध्यक्षांच्या पॅनलवर विरोधकांचा बहिष्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमातेची सेवा करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा संकल्प केला. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष नाममात्र होता. आता विरोधकांची संख्या वाढल्याने त्यांनी मोदी सरकारला पहिल्याच दिवशी झटका दिला. हंगामी अध्यक्षाच्या पॅनेलवर विरोधकांनी बहिष्कार घातला. इंडिया आघाडीच्या तीनही सदस्यांनी हंगामी अध्यक्षाच्या (प्रोटेम स्पीकर) पॅनेलवर बहिष्कार टाकला. काँग्रेसचे के. सुरेश, टीएमसीचे सुदीप बंडोपाध्याय आणि डीएमकेचे टीआर बालू यांनी या पॅनेलवर बहिष्कार टाकला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी के. सुरेश, सुदीप बंदोपाध्याय आणि टी.आर. बालू यांना हंगामी अध्यक्षपदाच्या समितीत नियुक्त केले होते. परंतु, या तिघांनी त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या समितीतील तीन सदस्य हंगामी अध्यक्षाला मदत करणार नाहीत. ते नवीन खासदारांना शपथ देणार नाहीत. लोकसभा अध्यक्ष निवडीनंतर पुन्हा नवीन पॅनल बनवले जाईल.

नरेंद्र मोदी यांनी घेतली शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी, तालिकाध्यक्ष राधामोहन सिंह यांनी खासदार पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी शपथ घेत असताना सभागृहात भाजप खासदारांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. मोदींनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकसभा सदस्यांनी शपथ घेतली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर विरोधकांनी ‘नीट-नीट’, ‘शेम-शेम’ अशा घोषणा दिल्या. अधिवेशनापूर्वी संसदेबाहेर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक आहे. सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. राज्यघटनेच्या मर्यादा पाळून देशाला पुढे न्यायचे आहे. देशाला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे.

लोकसभेची शपथ घेताना देशातील विविध भाषांचा वापर नवनिर्वाचित खासदारांनी केला. खासदारांनी संस्कृत, हिंदी, डोगरी, बंगाली, आसामी, उडिया व इंग्रजी भाषेत शपथ घेतली. गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महिला व बाल कल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी, दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व नगर विकासमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली.

नरेंद्र मोदी सरकारवर वचक ठेवणार - राहुल गांधी

अधिवेशनापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरून गेल्या १५ दिवसात देशात झालेल्या घटनांची जंत्रीच मांडली. त्यामुळे प्रत्येक मुद्यावर आता विरोधक सरकारला धारेवर धरणार असल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदी सरकारवर वचक ठेवणार असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी हे मानसशास्त्रीयदृष्ट्या बॅकफूटवर असून ते सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने राज्यघटनेवर केलेला हल्ला आम्हाला मान्य नाही आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. प्रबळ विरोधक म्हणून आम्ही दबाव कायम ठेवू आणि पंतप्रधानांना जबाबदारीपासून पळू देणार नाही.

आणीबाणी हा काळा डाग - मोदी

२५ जूनला आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘आणीबाणी हा काळा डाग’ असल्याची टीका केली. अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५० वर्षांपूर्वीच्या आणीबाणी कालखंडाचा उल्लेख करत काँग्रेसवर तोंडसुख घेतले. आज आपण २४ जूनला भेटत आहोत. उद्या २५ जून आहे. २५ जूनला भारताच्या लोकशाहीवर काळा डाग लागला होता, त्याला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. भारताची नवीन पिढी ही बाब कधीच विसरणार नाही की, भारताच्या राज्यघटनेला तेव्हा पूर्णपणे नाकारले होते. देशाचा तुरुंग बनवला होता. लोकशाहीच्या मुसक्या आवळल्या होत्या. ५० वर्षांपूर्वी केली गेलेली कृती पुन्हा करण्याची भारतात कधी कुणी हिंमत करणार नाही. आपण जिवंत लोकशाहीचा संकल्प करूया, असे मोदी म्हणाले. जनतेला अपेक्षा नाही की, संसदेत नखरे व्हावेत, ड्रामा होत राहावा. देशाला एका चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे. मला विश्वास आहे की, १८व्या लोकसभेत आपले खासदार सामान्य माणसाच्या या अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतील, असेही त्यांनी नमूद केले.

जे. पी. नड्डा राज्यसभेत भाजपचे सभागृह नेते

केंद्रीय मंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे राज्यसभेतील भाजपचे सभागृह नेते असणार आहेत. राज्यसभेत ते पियुष गोयल यांची जागा घेतील. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोयल हे लोकसभेवर निवडून आले. नड्डा यांच्याकडे आरोग्य, खत व रसायन खात्याचीही जबाबदारी आहे. राज्यसभेच्या वेबसाईटवर नड्डा यांचे नाव सभागृह नेते म्हणून अपडेट केले आहे. नड्डा यांची राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसने त्यांचे अभिनंदन केले आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा

न्या. संजीव खन्ना हे आपले उत्तराधिकारी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली शिफारस