वाराणसी : अयोध्येतील रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करणारे मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. प. दीक्षित यांच्या निधनाचे वृत्त कळताच काशीच्या जनतेत शोककळा पसरली आहे.
यंदाच्या जानेवारीत झालेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना पूजनात पं. लक्ष्मीकांत दीक्षित यांची मुख्य भूमिका राहिली होती. डिसेंबर २०२१ मध्ये काशी विश्वधाम लोकार्पण सोहळ्यातही ते सहभागी झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आज अचानक पंडितजींची प्रकृती बिघडली. त्यानंतर काही वेळेत त्यांचे निधन झाले. भारतीय सनातन संस्कृती आणि परंपरा आदींबाबत त्यांच्या मनात आस्था होती.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ग्वाल्हेर, राजस्थान आणि देशातील प्रमुख राजघराण्यांचे राज्याभिषेक पंडितजी आणि त्यांच्या पूर्वजांनी केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकात दीक्षित परिवारांच्या जुन्या पिढ्यांचे योगदान राहिले आहे.