संसद परिसरात तू-तू, मैं-मैं; सत्ताधारी विरोधकांमध्ये घोषणायुद्ध; अमित शहा भित्रे- काँग्रेसचा आरोप; राहुल यांची मनमानी- भाजपची टीका 
राष्ट्रीय

संसद परिसरात तू-तू, मैं-मैं; सत्ताधारी विरोधकांमध्ये घोषणायुद्ध; अमित शहा भित्रे- काँग्रेसचा आरोप; राहुल यांची मनमानी- भाजपची टीका

दिल्ली आंदोलनाच्या मुद्द्यावरून गेले तीन आठवडे संसदेत व संसदेबाहेर सुरू असलेला संघर्ष आता टिपेला पोचला आहे. इतके दिवस बचावात्मक पवित्र्यात असलेले सत्तारूढ भाजपचे सदस्य झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनानंतर आक्रमक झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून आज संसदेत व बाहेर काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांमध्ये जोरदार घोषणायुद्ध पाहायला मिळाले.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली आंदोलनाच्या मुद्द्यावरून गेले तीन आठवडे संसदेत व संसदेबाहेर सुरू असलेला संघर्ष आता टिपेला पोचला आहे. इतके दिवस बचावात्मक पवित्र्यात असलेले सत्तारूढ भाजपचे सदस्य झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनानंतर आक्रमक झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून आज संसदेत व बाहेर काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांमध्ये जोरदार घोषणायुद्ध पाहायला मिळाले.

परपस्परांविरोधात निदर्शने

संसद भवनाच्या मकर द्वाराबाहेर सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी दोन्ही गटांमध्ये प्रत्यक्ष संघर्ष होऊ नये म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हातात हात गुंफून दोन्ही बाजूंच्या खासदारांच्या मध्ये मानवी साखळी तयार केली होती.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे आणि अयोध्येतील राम मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरव्यवहारावर संसदेत चर्चा घडवून आणावी, अशी काँग्रेस व इतर विरोधकांची मागणी आहे.

याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनीही निदर्शने केली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे चर्चेपासून पळ काढत असून त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कनिष्ठ भागीदार आहे. तेथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा मुद्दा भाजप खासदारांनी उपस्थित केला.

दिल्ली आंदोलनाबाबत अमित शहा संसदेत उत्तर देतील असे काल भाजपने जाहीर केले होते. मात्र मात्र, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना, विरोधकांना अमित शहांचे ‘मत’ ऐकण्यात रस नसून दिल्लीतील पोलिसांच्या कारवाईमागे कोण जबाबदार आहे, याचे उत्तर हवे असल्याचे म्हटले.

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी संसदेत दाखल होत असताना भाजप खासदार मुकेश दलाल राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते.“शर्म करो, शर्म करो, राहुल गांधी, शर्म करो,” अशा घोषणा दलाल देत होते.

यावेळी प्रियंका गांधी यांनी स्मितहास्य करत त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, “राहुल गांधी झारखंडमधील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधीच भेटले आहेत.”

भाजपच्या निदर्शनांमध्ये “झारखंड में छात्रों पे लाठीचार्ज पर राहुल गांधी जवाब दो” अशा आशयाचे फलक झळकवण्यात आले.

काँग्रेसने याला प्रत्युत्तर दिले. “झारखंडमध्ये जे घडले त्याची जबाबदारी झारखंड सरकारची आहे. राहुल गांधी तेथील मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री नाहीत. दिल्लीमध्ये काय घडते याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आहे, कारण दिल्ली पोलीस त्यांच्या अखत्यारीत येतात,” असे मणिकम टागोर म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी सोमवारी झारखंडमधील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याचा निषेध केला होता.

तिसऱ्या आठवड्यातही गदारोळ कायम

नवी दिल्ली : दिल्ली आंदोलनावरील लाठीमारप्रकरणी अमित शहा यांनी निवेदन करावे या मागणीवरून संसदेत सुरू असलेला गदारोळ मंगळवारीही सुरूच राहिला. शहा हे आजही सभागृहात आले नाहीत. त्यामुळे इतरांना धमकावणारे खरे तर स्वतःच भित्रे असतात, असे म्हणत काँग्रेसने शहा यांच्यावर निशाणा साधला. तर आपल्या ‘मनमानी आणि बेशिस्त वर्तनातून’ काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेला वेठीस धरत आहेत, असा आरोप भाजपने केला.

लोकसभेच्या कामकाजाच्या यादीत त्यांच्या नावावर कामकाज असतानाही शहा सभागृहात अनुपस्थित राहिले. शहा गेल्या १७ दिवसांपासून लोकसभा तसेच राज्यसभेत अनुपस्थित आहेत. हे खरोखरच अभूतपूर्व असल्याचेही माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी म्हटले.

दुसरीकडे भाजपने काँग्रेसवर टीका केली. भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, नीट आणि विद्यार्थ्यांशी संबंधित राहुल गांधी यांच्या अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत सविस्तर निवेदन देण्यास तयार आहेत. मात्र, काँग्रेस नेते त्यापासून “पळ काढत आहेत”.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई, ठाणे, कोकणात आज 'कोसळ'धार; पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

पावसाळ्यात त्वचेवर खाज अन् लालसरपणा? 'या' टिप्स येतील कामी

सुशिक्षित बेरोजगारांचा वाली कोण?

आजचे राशिभविष्य, १२ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

श्रावणात उपवासासाठी बनवा कुरकुरीत फराळी चिवडा! साबुदाणा, मखाणे अन् शेंगदाण्याची भन्नाट चव