जम्मू-काश्मीरमधील रामबन आणि रामसूदरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील एका बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेत एक मजूर ठार झाला आहे. याठिकाणी काम करणारे १३ मजूर ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी ३ मजुरांची सुटका करण्यात आली असून अद्याप ९ मजूर ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत. अद्याप बचावकार्य सुरूच असले तरी ९ जणांचे जीव वाचवण्याची शक्यता धूसर बनली आहे.
गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाजवळील रामबन जिल्ह्यातील माकेरकोट भागात खुनी नाल्याजवळ ही दुर्घटना घडली. जिथे हा बोगदा बांधला जात होता. बोगदा कोसळल्यानंतर लगेचच पोलीस आणि लष्कराने संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. या अपघातात बोगद्यासमोर उभी असलेली वाहने, बुलडोझर, ट्रक यांसह अनेक मशिनचेही नुकसान झाले आहे.
बेपत्ता झालेल्या मजुरांमध्ये ५ पश्चिम बंगालचे, २ नेपाळचे, एक आसाममधील आणि दोन जम्मू-काश्मीरमधील रहिवासी आहेत. यामध्ये जाधव रॉय (२३), गौतम रॉय (२२), सुधीर रॉय (३१), दीपक रॉय (३३), परिमल रॉय (३८) सर्व रा. पश्चिम बंगाल, नवाज चौधरी (२६), कुशी राम (२५) रा. नेपाळ यांचा समावेश आहे. चौहान (२६) आसाम, मुझफ्फर (३८) व इसरत (३०) हे जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत.