नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ९० पैशांनी वाढ केली. अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत दुसऱ्यांदा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. इराण संघर्षानंतर जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे होणारा प्रचंड तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९७.७७ रुपयांवरून ९८.६४ रुपयांवर पोहोचला आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर ९०.६७ रुपयांवरून ९१.५८ रुपयांवर गेला आहे. याआधी शुक्रवारी प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. मुंबईत आता पेट्रोलचा दर प्रति लिटर १०७.५९ रुपये आणि डिझेलचा दर ९४.०८ रुपये झाला आहे, तर कोलकात्यामध्ये हे दर अनुक्रमे १०९.७० रुपये आणि ९६.०७ रुपयांवर पोहोचले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०४.४९ रुपये आणि डिझेलचा दर ९६.११ रुपये प्रति लिटर आहे.
पश्चिम बंगालसह पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणुकांपैकी तीन राज्यांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विजय मिळवून आपला राजकीय विस्तार केल्यानंतर, शुक्रवारी पहिली दरवाढ करण्यात आली होती. या दरवाढीनंतरही तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. १५ मे रोजी झालेल्या दरवाढीमुळे तोटा सुमारे एक चतुर्थांशाने कमी झाला आहे, तरीही सरकारी तेल कंपन्यांना दररोज सुमारे ७५० कोटी रुपयांचा तोटा होत आहे, असे पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
विरोधकांचा आरोप
फेब्रुवारीच्या अखेरीस इराणवर अमेरिका-इस्रायलने केलेले हल्ले आणि जागतिक तेल वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'मधून होणाऱ्या पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे जागतिक खनिज तेलाच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही लागोपाठ दुसरी दरवाढ करण्यात आली आहे. किमतीत वाढ होऊनही तेल कंपन्यांनी किरकोळ बाजारातील दर कमी ठेवले होते. ग्राहकांना महागाईपासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारने म्हटले होते. मात्र, विरोधी पक्षांनी महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका संपेपर्यंत सरकारने ही दरवाढ रोखून धरल्याचा आरोप केला होता.
दररोज ७५० कोटी तोटा
'क्रिसिल'च्या मते, आधीच्या दरवाढीनंतरही तेल विपणन कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर सुमारे १० रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर १३ रुपये तोटा सहन करावा लागत होता. पेट्रोल आणि डिझेलचे दर आता मे २०२२ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. राष्ट्रीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२४ मध्ये करण्यात आलेल्या प्रति लिटर २ रुपयांच्या कपातीचा अपवाद वगळता, एप्रिल २०२२ पासून इंधनाचे दर स्थिर होते.
मोदींचे आवाहन
भारताचे तेल आयात बिल नियंत्रित करण्यासाठी आणि इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांच्या दरम्यान ही इंधन दरवाढ झाली आहे. ऊर्जेच्या वाढत्या किमतींमुळे परकीय चलन साठ्यावर ताण पडत असल्याने आणि चालू खात्यातील तूट वाढण्याची भीती असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात नागरिकांना आणि सरकारी विभागांना इंधनाची बचत करण्याचे, वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले होते.
याच कालावधीत कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या किमतीतही दोनदा वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये १५ मे रोजी झालेल्या २ रुपयांच्या वाढीनंतर रविवारी पुन्हा प्रति किलो १ रुपयाची वाढ करण्यात आली. सरकारी कंपन्यांच्या आधी खासगी तेल कंपन्यांनी किमती वाढवण्यास सुरुवात केली होती. 'नायरा एनर्जी'ने मार्चमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ५ रुपये आणि ३ रुपयांपर्यंत वाढ केली होती, तर 'शेल'ने १ एप्रिलपासून पेट्रोल ७.४१ रुपयांनी आणि डिझेल २५ रुपयांनी महाग केले होते.
नवे दर रुपये प्रतिलिटर
शहर पेट्रोल डिझेल
नवी दिल्ली ९८.६४ ९७.७७
मुंबई १०७.५९ ९४.०८
कोलकाता १०९.७० ९६.११
चेन्नई १०४.४९ ९६.११