नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणारे एक पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेक विभागाने त्याचा खुलासा केला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून असे कोणतेही पत्र जारी करण्यात आलेले नसून, व्हायरल होत असलेला दस्तऐवज पूर्णपणे बनावट असल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे.
PIB ने फेटाळला दावा
पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीचे असल्याचा दावा करणारे पत्र बनावट आहे. पंतप्रधान कार्यालयाने असे कोणतेही पत्र जारी केलेले नाही आणि त्यावरील स्वाक्षरीही खरी नाही, असे पीआयबीने स्पष्ट केले.
पडताळणीशिवाय माहिती शेअर करू नका
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही खळबळजनक दाव्याची अधिकृत सरकारी स्रोतांद्वारे खातरजमा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये किंवा तो पुढे पाठवू नये, असे आवाहन पीआयबीने नागरिकांना केले आहे.
बनावट कागदपत्रांचा गैरवापर वाढला
बनावट पत्रे, अधिकृत कागदपत्रांची बनावट प्रत, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)च्या मदतीने तयार केलेली दिशाभूल करणारी सामग्री वापरून अफवा पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याचा इशाराही पीआयबीने दिला आहे. त्यामुळे कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करण्यापूर्वी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
संशयास्पद माहितीची तक्रार कुठे कराल?
दिशाभूल करणारी किंवा बनावट माहिती आढळल्यास नागरिकांनी ती पीआयबी फॅक्ट चेककडे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक ८७९९७११२५९ किंवा factcheck@pib.gov.in या ई-मेलवर माहिती पाठवता येणार आहे.
तथ्य पडताळणीची गरज वाढली
ऑनलाइन माध्यमांवर बनावट माहितीचा वाढता प्रसार लक्षात घेता, कोणतीही पोस्ट किंवा दस्तऐवज पुढे शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासणे हीच दिशाभूल रोखण्याची सर्वात प्रभावी पद्धत असल्याचे पीआयबीने अधोरेखित केले आहे.