नवी दिल्ली : ‘निःस्वार्थ सेवा’ आणि ‘शिस्त’ हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खरी ताकद आहे आणि स्वयंसेवकांच्या प्रत्येक कृतीत ‘राष्ट्र प्रथम’ हा भाव नेहमीच सर्वोच्च असतो, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. त्यांचा उद्देश देशाला बौद्धिक गुलामगिरीतून मुक्त करणे हा होता. संघाचा प्रवास जितका प्रेरणादायी आहे तितकाच अद्वितीय आहे, असे ते म्हणाले.
मोदी यांनी हेडगेवार यांचे उत्तराधिकारी एम. एस. गोळवलकर यांचेही कौतुक केले. त्यांचे वाक्य “हे माझे नाही, हे राष्ट्राचे आहे” लोकांना स्वार्थापलीकडे जाऊन राष्ट्रासाठी समर्पण शिकवते, असे ते म्हणाले. या त्यागभावना व सेवाभावाने लाखो स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले आहे.
मोदी म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ सतत राष्ट्रीय सेवेत मग्न आहे. संघ पुढील आठवड्यात विजयादशमीला १०० वर्षांचा होणार आहे. देश जेव्हा शतकानुशतके गुलामगिरीच्या बेड्यात होता तेव्हा लोकांचा आत्मसन्मान व आत्मविश्वास कमी झाला होता आणि जगातील प्राचीन संस्कृती ही आपली ओळख संकटात सापडली होती. म्हणूनच स्वातंत्र्याबरोबरच बौद्धिक गुलामगिरीतून मुक्त होणेही आवश्यक होते.
जेव्हा कुठे नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा सर्वात आधी पोहोचणारे संघाचे स्वयंसेवक असतात. ‘राष्ट्र प्रथम’ हा भाव स्वयंसेवकांच्या प्रत्येक कृतीत आणि उपक्रमात नेहमीच प्रकट होतो. १२६व्या ‘मन की बात’ रेडिओ प्रसारणात मोदी यांनी स्वदेशीवर भर देत गांधी जयंतीला खादी खरेदी करण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, या सणासुदीच्या काळात आपण केवळ स्वदेशी वस्तूंनीच उत्सव साजरा करण्याचा निर्धार करा. ‘वोकल फॉर लोकल’ हाच खरेदीचा मंत्र बनवा. तुम्ही केवळ देशात निर्माण झालेल्याच वस्तू विकत घ्या. यामुळे कारागिरांचा सन्मान होईल, कुटुंबाला आशा मिळेल आणि तरुण उद्योजकांच्या स्वप्नांना पंख मिळतील.
मोदींनी सांगितले की, सरकार ‘छठ’ उत्सवाला युनेस्कोच्या सांस्कृतिक यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याआधी कोलकाताची दुर्गापूजाही या यादीत समाविष्ट झाली आहे.
कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी नौदलाच्या महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रूपा यांच्याशी संवाद साधला. ‘नाविका सागर परिक्रमा’ मोहिमेत त्यांनी दाखवलेल्या शौर्य व चिकाटीचे मोदींनी कौतुक केले व महिलांचा प्रत्येक क्षेत्रातील वाढता सहभाग अधोरेखित केला.
ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर खादीचे आकर्षण कमी झाले होते. पण गेल्या ११ वर्षांत खादीची लोकप्रियता झपाट्याने वाढली असून विक्री सातत्याने वाढत आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘रामायणातील भगवान रामाची सेवा, सौहार्द व करुणा हीच खरी शिकवण आहे. त्यामुळे माता शबरी व निषादराजाशिवाय वाल्मिकी रामायणातील राम पूर्ण होत नाही. राममंदिराला भेट देताना या मंदिरांनाही भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
भगतसिंग व लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली
मोदींनी या कार्यक्रमात क्रांतिकारक भगतसिंग आणि प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
'अमर शहीद भगतसिंग हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान आहेत, विशेषतः तरुणांसाठी. तर लता मंगेशकर यांनी गायलेल्या देशभक्तिपर गीतांनी जनतेला प्रेरणा दिली, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात मंगेशकर यांचे 'ज्योती कलश छलके' हे गीत प्रसारित झाले.