केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू 'एआय' ने बनविलेली प्रतिमा
राष्ट्रीय

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

PNG उपलब्ध असलेल्या भागात ३ महिन्यांत पाइप्ड गॅस कनेक्शन घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. अन्यथा LPG पुरवठा बंद होणार असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मध्यपूर्वेतील युद्धामुळे एलपीजी (LPG) पुरवठ्यावर परिणाम होत असताना केंद्र सरकारने पाईपद्वारे पुरवला जाणारा नैसर्गिक वायू (Piped Natural Gas-PNG) वापराला चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या भागात PNG उपलब्ध आहे, तेथे घरगुती ग्राहकांनी ३ महिन्यांत PNG कनेक्शन घ्यावे, अन्यथा द्रवरूप पेट्रोलियम वायू (Liquefied petroleum Gas-LPG) पुरवठा बंद केला जाईल, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

३ महिन्यांची मुदत, नंतर LPG बंद

सरकारच्या आदेशानुसार, अधिकृत संस्थेकडून PNG उपलब्ध असल्याची सूचना मिळाल्यानंतर संबंधित ग्राहकांना ३ महिन्यांच्या आत PNGकडे वळणे बंधनकारक असेल.

"सूचना दिल्यानंतर तीन महिन्यांनंतर त्या पत्त्यावर LPG पुरवठा थांबवण्यात येईल," असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

सतत गॅस पुरवठा, रिफिलची गरज नाही

PNG ही पाइपलाइनद्वारे थेट घरात पोहोचणारी सेवा असून यासाठी सिलिंडर बुकिंग किंवा रिफिलची गरज भासत नाही. त्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी अधिक सोयीस्कर पर्याय म्हणून याला प्राधान्य दिले जात आहे.

तांत्रिक अडचण असल्यास सवलत

ज्या ठिकाणी पाइपलाइनद्वारे PNG पुरवठा करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, अशा प्रकरणांमध्ये अधिकृत संस्थेकडून 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' (NOC) दिल्यास LPG पुरवठा सुरू ठेवता येईल.

गृहनिर्माण सोसायट्यांना आदेश

  • गृहनिर्माण सोसायट्यांनी PNG कनेक्शनसाठी परवानगी ३ कामकाजाच्या दिवसांत द्यावी.

  • शेवटच्या टप्प्यातील (last-mile) कनेक्टिव्हिटी ४८ तासांत उपलब्ध करून द्यावी.

  • पाइपलाइन कनेक्शनसाठी आलेले अर्ज नाकारता येणार नाहीत.

या निर्णयामुळे देशभरात PNGचा वापर वाढवण्याचा आणि LPGवरील अवलंबन कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गॅस बुकिंगच्या अफवांवर सरकारचे स्पष्टीकरण

सरकारच्या निदर्शनास आले आहे की, काही वृत्तांमध्ये आणि सोशल मीडियावर LPG रिफिल बुकिंगच्या कालावधीमध्ये बदल झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. PMUY कनेक्शनसाठी ४५ दिवस, तर non-PMUY सिंगल बॉटलसाठी २५ दिवस आणि डबल बॉटलसाठी ३५ दिवस अशी नवीन वेळमर्यादा लागू झाल्याचे दावे करण्यात येत असले तरी सरकारने हे पूर्णपणे फेटाळले आहेत.

सध्या शहरी भागात २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवस अशीच वेळमर्यादा सर्व प्रकारच्या कनेक्शनसाठी लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक किंवा घाबरून LPG रिफिल बुकिंग करू नये, तसेच देशात LPG चा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणतीही टंचाई नसल्याचेही सरकारने नमूद केले आहे.

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

१३ वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणाचे निधन; दिल्लीत अखेरचा निरोप, कुटुंबीयांकडून अवयवदानाचा निर्णय

Iran vs US-Israel War : युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव; इराणसमोर ठेवल्या 'या' १५ अटी

विद्युती आणि दुहेरीकरणासह पुणे-मिरज रेल्वेमार्ग पूर्ण; वेग वाढला, पण गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी

Navi Mumbai : भोंदूगिरीतील पैशांचे शिरढोण कनेक्शन उघड; पनवेलमध्ये कोट्यवधींच्या जमीन व्यवहारांवर संशय