रेल्वेच्या एसी कोचमधून उतरल्यानंतरही तीन व्यक्ती प्रचंड घामाघुम दिसत होत्या. संशय आल्यामुळे जीआरपी कर्मचाऱ्याने त्यांची विचारपूस केली आणि मोठा भांडाफोड झाला. तिघेही सराईत गुंड असल्याचं समोर आलं. त्यानंतर तिघांनाही बेड्या घालण्यात आल्या.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. येथे सुरू असलेल्या 'ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी' मोहिमेअंतर्गत जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, स्टेशनवर जीआरपी कर्मचाऱ्यांनी तीन व्यक्तींना वातानुकूलित कोचमधून उतरताना आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर हावडाच्या दिशेने बसलेले पाहिले. उल्लेखनीय म्हणजे, तिघेही घामाघुम होते.
इतका घाम का येतोय?
एसी कोचमधून उतरल्यावरही इतका घाम येताना बघून जीआरपी कर्मचाऱ्यांना संशय आला. तिघांची चौकशी केली असता कोच खूप गरम होता असे त्यांनी सांगितले. पण एसीमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळला नाही. पुढील तपासणीत प्रत्येक व्यक्तीकडे दोन मोबाईल फोन असल्याचे दिसून आले आणि अधिकाऱ्यांनी लगेच त्यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले.
तिघेही सराईत गुन्हेगार
संजय कुमार (रोहतक, हरियाणा), विनोद कुमार (हिसार, हरियाणा) आणि दिलीप साहू (बांदा, उत्तर प्रदेश) अशी या तिघांची नावे आहेत. तिघेही सराईत गुन्हेगार असून चोरीच्या घटनांमध्ये दीर्घकाळापासून जीआरपीच्या रडारवर असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून सहा मोबाईल फोन, एक सोन्याची अंगठी आणि एक पायल यासह अनेक चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मोबाईल फोनची अंदाजे किंमत अंदाजे १.५ लाख रुपये आहे.