रस्त्यावर पडलेल्या मद्यधुंद तरुणाच्या मदतीसाठी थांबलेल्या लोकांना भरधाव बसने उडवले; अपघात कॅमेऱ्यात कैद - VIDEO 
राष्ट्रीय

रस्त्यावर पडलेल्या मद्यधुंद तरुणाच्या मदतीसाठी थांबलेल्या लोकांना भरधाव बसने उडवले; अपघात कॅमेऱ्यात कैद - VIDEO

पंजाबच्या लुधियानामध्ये रस्त्यावर नशेत पडलेल्या तरुणाला मदत करणाऱ्या लोकांना भरधाव कॉलेज बसने धडक दिली. या अपघातात एका लहान मुलासह ४ जण जखमी झाले असून, घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Mayuri Gawade

पंजाब : रस्त्यावर एखादी व्यक्ती अडचणीत दिसली की मदतीसाठी धावून जाणारे लोक आजही आहेत. मात्र, पंजाबमध्ये अशीच मदत करायला थांबलेल्या काही जणांसोबत धक्कादायक घटना घडली. लुधियाना जिल्ह्यात रस्त्यावर नशेत पडलेल्या एका तरुणाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी काही लोक थांबले होते. त्याला मदत करत असतानाच मागून भरधाव वेगाने आलेल्या कॉलेज बसने या लोकांना धडक दिली. या अपघातात एका लहान मुलासह चौघे जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मदत करत असतानाच बसने दिली धडक

समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १५) लुधियानातील माछीवाडा-कुहाडा मार्गावर ही घटना घडली. रस्त्यावर एक तरुण स्कूटरसह पडलेला होता. तो नशेत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याला पाहून काही लोक मदतीसाठी थांबले. त्यांनी आपली दुचाकी वाहनं रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि त्या तरुणाला जवळच्या पेट्रोल पंपाच्या दिशेने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न सुरू केला.

मात्र, याच वेळी मागून एक पिवळ्या रंगाची कॉलेज बस भरधाव वेगाने आली आणि मदत करणाऱ्या लोकांना धडक दिली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यामध्ये काही जण रस्त्यावर पडलेल्या तरुणाशी बोलताना दिसतात. त्याचवेळी मागून आलेली बस त्यांना धडक देत असल्याचं दिसतं.

पाहा व्हायरल व्हिडिओ

चिमुकल्यासह चौघे जखमी

'द ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, या अपघातात एका लहान मुलासह चौघे जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली असून, इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी किरणदीप सिंह हा आपल्या कारच्या दुरुस्तीसाठी माछीवाड्याकडे जात होता. त्यावेळी रस्त्यावर एक तरुण नशेत पडलेला दिसल्याने तो मदतीसाठी थांबला. इतर काही जणही त्या तरुणाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पुढे आले. मात्र, त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव बसने त्यांना धडक दिली.

या अपघातात जखमी झालेल्या प्रदीप सिंह यांनी धडकेचा अनुभव सांगताना बसचा वेग खूप जास्त असल्याचं म्हटलं. धडक इतकी जोरदार होती की त्यांच्या डोक्यावरील पगडी दूर जाऊन पडली. या अपघातात त्यांच्या मानेला, पाठीला आणि पायांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती त्यांनी दिली.

बसचालक मद्यधुंद असल्याचा आरोप

दरम्यान, जखमींनी बसचालक मद्यधुंद असल्याचा आरोप केला आहे. बसने ज्या प्रकारे धडक दिली, त्यावरून हा अपघात जाणीवपूर्वक घडवला असावा, अशी शंकाही किरणदीप सिंह यांनी व्यक्त केली. मात्र, माछीवाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी चरणजीत सिंह यांनी या आरोपांबाबत वेगळी माहिती दिली. प्राथमिक तपासात बसचालक मद्यधुंद असल्याचं आढळलेलं नाही. रस्त्यावर उभे असलेले लोक चालकाला दिसले नसावेत आणि त्यामुळे अपघात झाला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

जखमींनी रुग्णालयावरही केले आरोप

अपघातानंतर जखमींना माछीवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रविवार असल्याने तिथे डॉक्टर उपस्थित नव्हते, असा आरोप जखमींनी केला. प्राथमिक उपचारांच्या नावाखाली इंजेक्शन देऊन दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, अपघातानंतर बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. पोलिसांकडून जखमींचे जबाब नोंदवण्यात येत असून, अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : दाऊद इब्राहिमच्या जुन्या घरावर अखेर हातोडा; भेंडी बाजारात BMC ची तोडक कारवाई सुरू; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

ठाकरेंचा निर्णय वैचारिक फारकत घेणारा; मविआ सरकार स्थापनेबाबत शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Mumbai : मालवाहतुकीत ११ टक्क्यांची वाढ; ४,८०९ कोटींचे उत्पन्न

Mumbai : कॅफे आयडियल, चेतनासह नऊ रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित; FDA ची मोठी कारवाई

Mumbai : दादर रेल्वे स्थानक लवकरच 'चैत्यभूमी'; नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार - मुख्यमंत्री