महासत्तेची महत्त्वाकांक्षा बाळगणे गैर नाही पण...; रघुराम राजन यांनी दिला इशारा (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

महासत्तेची महत्त्वाकांक्षा बाळगणे गैर नाही पण...; रघुराम राजन यांनी दिला इशारा

भारताला वेळेआधीच महासत्ता म्हणून घोषित करण्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. तेथे पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा असण्यात काही गैर नाही, पण त्या टप्प्यावर पोहोचायला आपल्याला अनेक दशके वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दीर्घकालीन विकासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, असेही राजन यांनी स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताला वेळेआधीच महासत्ता म्हणून घोषित करण्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. तेथे पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा असण्यात काही गैर नाही, पण त्या टप्प्यावर पोहोचायला आपल्याला अनेक दशके वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दीर्घकालीन विकासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, असेही राजन यांनी स्पष्ट केले.

उद्योजक कुशल लोढा यांच्या पॉडकास्टमध्ये राजन म्हणाले की, भारत महासत्ता बनला आहे, असे म्हटल्याने भविष्यात कराव्या लागणाऱ्या कठोर परिश्रमांपासून लक्ष विचलित होण्याचा धोका निर्माण होतो. आज भारताला महासत्ता म्हणणे हे अकाली आहे. खरे काम अजून बाकी आहे आणि त्यासाठी अनेक दशकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे.

स्वप्ने पाहिली पाहिजेत, पण...…

आपल्याला महत्त्वाकांक्षा असली पाहिजे, आपण स्वप्ने पाहिली पाहिजेत, पण ती साध्य करण्याची शक्यताही असली पाहिजे. यासाठी आपल्याला मोठी तयारी करावी लागेल. तुम्ही फक्त स्वप्न पाहून ‘आपण तिथे पोहोचलो आहोत’ असे म्हणू शकत नाही, कारण आपण अजून तिथे पोहोचलेलो नाही, असे रघुराम राजन म्हणाले.

आपण खूप दूर

भारताला जागतिक स्तरावर प्रभावी देश म्हणून वारंवार सादर केल्याने नोकऱ्या, कौशल्ये, शिक्षण आणि संस्थांमधील त्रुटींकडे दुर्लक्ष होते, यावर त्यांनी भर दिला. “जेव्हा आपण सतत असा विचार करतो की, आपण आधीच एक महासत्ता आहोत, तेव्हा मला चिंता वाटते. आपण महासत्ता नाही. जर आपण योग्य गोष्टी केल्या तर आपण कदाचित तेथे पोहोचू, पण आपण अजून त्यापासून खूप दूर आहोत, असे राजन म्हणाले.

सातत्यपूर्ण प्रयत्न हवे

राजन यांच्या मते, फक्त घोषणा दिल्याने आपण महासत्ता बनणार नाही. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे. याचा अर्थ, तुम्ही जेथे असाल तेथे भारताची उभारणी करण्यात सातत्याने योगदान दिले पाहिजे. मग तुम्ही सशस्त्र दलात असाल, सामान्य नागरिक असाल, शैक्षणिक क्षेत्रात असाल किंवा डॉक्टर असाल. अशा पद्धतीने काम केल्यास आपल्याला पुढील ३० वर्षांत हे ध्येय साध्य करता येईल, असे ते म्हणाले.

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन