नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर संसदेत चर्चा घडवून आणण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान म्हणजे फुटलेल्या प्रतिमेच्या "फुग्यात" हवा भरण्याचा शेवटचा प्रयत्न आहे, असा जोरदार टोला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लगावला. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आणि पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले, हे देशातील तरुणांना जाणून घ्यायचे आहे, असे ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्षाला संसदेत अमित शहा यांची "भाषणे" ऐकण्यात अजिबात रस नाही. दिल्ली पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्स हे दोन्ही गृह मंत्रालयांतर्गत येतात. त्यामुळे जर अमित शहा यांनी विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले असतील, तर ते गुन्हेगार आहेत; आणि जर त्यांनी हे आदेश दिले नसतील, तर ते अकार्यक्षम आहेत. दोन्ही परिस्थितींमध्ये त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे.
पत्रकारांवरही निशाणा
पत्रकारांवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, अमित शहा बोलतात तेव्हा तुम्ही त्यांना असे मध्येच अडवता का, शहा यांच्यासमोर मीडिया उंदरासारखा का उभा राहतो, देशातील विद्यार्थी घाबरलेले नाहीत, त्यामुळे मीडियानेही घाबरण्याचे कारण नाही. गेल्या २० दिवसांपासून ते गायब होते. त्यांच्याभोवती ३० गाड्यांचा ताफा असतो आणि त्यांच्या घराबाहेर हजारो पोलिसांचा पहारा असतो, जेणेकरून कोणताही विद्यार्थी तेथे पोहोचू नये. गृहमंत्र्यांची प्रतिमा असलेला फुगा आता फुटला आहे, आणि आता त्यात पुन्हा हवा भरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यात सभागृहात येण्याचे धैर्य नाही.