नवी दिल्ली : काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपला धारेवर धरले. निवडणूक आयोग हा ‘वोटचोर’ असून भारतीय जनता पक्षाने मतचोरी करून ‘ऑपरेशन सरकार चोरी’ केली, असा आरोप त्यांनी केला. हरयाणामध्ये २५ लाख मतांची चोरी झाली, असा आरोप करत राहुल गांधी यांनी हरयाणा विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे घोटाळा झाला, याचे मोठ्या स्क्रीनवर पुरावे दाखवत सादरीकरण केले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले. “देशात सध्या ‘ऑपरेशन सरकार चोरी’ सुरू आहे. हरयाणामध्ये ब्राझिलियन मॉडेलचे मतदार कार्ड तयार होते आणि ती मॉडेल २२ ठिकाणी मतदान करते. हरयाणामध्ये जे घडले तेच आता बिहारमध्येही घडणार आहे. बिहारमधील मतदार याद्यांमध्येही घोटाळे झाले आहेत. मतदारयादी विरोधी पक्षांना शेवटच्या क्षणी देण्यात आली,” असा दावाही त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी बिहारमधील जमुई येथून आलेल्या पाच मतदारांना मंचावर निमंत्रित केले. मतदार यादीतून आमचे नाव कापण्यात आले आहे, असे या पाचही जणांचे म्हणणे आहे. त्यांच्या गावातील ३०० लोकांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी यावेळी हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधीचा व्हिडियो दाखवला. ‘‘भाजपचा एकतर्फी विजय होणार असून आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. आमच्याकडे निवडणूक जिंकण्याची सर्व व्यवस्था आहे. तुम्ही काहीही चिंता करू नका,” असा दावा सैनी या व्हिडियोमध्ये करतात. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, “सैनी यांची देहबोली आणि त्यांचे हास्य यावरूनच मतचोरीची सर्व व्यवस्था त्यांच्याकडे असल्याचे प्रतित होते. मतचोरी केल्यामुळेच त्यांच्या चेहऱ्यावर हा आत्मविश्वास निवडणुकीआधीच जाणवत होता. काँग्रेसचे पारडे जड असतानाही मतचोरीमुळेच काँग्रेसचा हरयाणामध्ये पराभव झाला.”
राहुल यांनी एका ब्राझिलियन मुलीचा फोटो दाखवत तिचे नाव हरयाणाच्या मतदार यादीत असल्याचा आरोप केला. “ही महिला गोवा किंवा महाराष्ट्रातील नसून ब्राझीलमधील मॉडेल आहे. तिच्या नावाने हरयाणात २२ वेळा मतदान करण्यात आले. कधी स्वीटी, कधी सीमा, तर कधी सरस्वती या नावाने तिने मतदान केले. या मॉडेलचे नाव मला माहित नाही, मात्र या महिलेचा फोटो मॅथियस फरेरा याने अनस्प्लॅश डॉटकॉमवर अपलोड केलेला होता. एका ब्राझिलियन मॉडेलचे नाव हरयाणाच्या मतदार यादीत कसे आले?,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“हरयाणामध्ये प्रथमच पोस्टल बॅलेट आणि प्रत्यक्ष मतांच्या निकालात मोठा फरक दिसला. पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेसला ७६ जागा आणि भाजपला फक्त १७ जागा मिळाल्या असत्या. पूर्वी दोन्हींचा कल जवळपास सारखाच असायचा. एक्झिट पोल आणि पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेस आघाडीवर होती, पण शेवटी काँग्रेस २२,७७९ मतांनी पराभूत झाली. एक लाखाहून अधिक मतांचा फरक दिसून आला. आमच्याकडे याचे पुरावे आहेत. हरयाणामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये एकूण २५ लाख मतांची चोरी झाली. ५ लाख २१ हजारांहून अधिक दुबार मतदार आढळले,” असा आरोपही राहुल गांधींनी केला.
ते म्हणाले की, “दलचंद नावाचे इसम हे उत्तर प्रदेश आणि हरयाणातील मतदार आहेत. त्यांचा मुलगाही हरयाणातील मतदार आहे आणि उत्तर प्रदेशात भाजपला मतदान करतो. मथुराचे सरपंच प्रल्हाद यांचे नावही हरयाणातील अनेक ठिकाणी मतदार यादीत आहे. ज्यांच्याकडे घर नाही अशा लोकांसमोर घर क्रमांक शून्य नोंदवले जाते. जेणेकरून कोणीही त्यांना शोधू नये. पण आम्हाला ते सापडले. त्यांचा घर क्रमांक ० दाखवला आहे, जेणेकरून ते मतदान करू शकतील आणि ते कोण आहेत हे कोणालाही कळू न देता निघून जाऊ शकतील. हजारो लोकांनी हे केले. हे जाणूनबुजून केले आहे. एका घरात ६६ लोक राहत असल्याची उदाहरणे आहेत, कारण घरातील एक सदस्य भाजप नेत्याशी संबंधित आहे. एका घरात १०० पेक्षा जास्त लोक होते; आम्ही जाऊन तपासणी केली, पण तिथे कोणीही सापडले नाही.”
आठपैकी एक मतदार बनावट
हरयाणात एकूण सुमारे दोन कोटी मतदार आहेत. जर २५ लाख मतांची चोरी झाली असेल, तर याचा अर्थ प्रत्येक आठपैकी एक मतदार बनावट होता. त्यामुळेच काँग्रेसचा पराभव झाला. एका बूथवर एका महिलेचे नाव २२३ वेळा नोंदवले गेले आहे. त्या महिलेने किती वेळा मतदान केले, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे. ९ पुरुषांच्या नावांच्या जागी महिलांची नावे टाकण्यात आली आहेत, असे आरोपही राहुल गांधींनी केले.
बूथ एजंट्सनी तेव्हाच आक्षेप का घेतला नाही -निवडणूक आयोग
राहुल गांधी यांच्या या आरोपांवर हरयाणा राज्य निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. “राहुल गांधी यांचे आरोप खोटे आणि निराधार आहेत. राहुल गांधी यांनी जे पुरावे दाखवले आहेत, त्यासंबंधी कोणतीही तक्रार आयोगाकडे केलेली नाही. राजकीय पक्षांकडून निवडणुकीत मतदानावर लक्ष ठेवण्यासाठी बूथ लेव्हल एजंट्स नेमले जातात. त्यांनी मतदार यादीतील या नावांबद्दल तेव्हाच विरोध का केला नाही? मतदार यादीची पडताळणी करताना काँग्रेसच्या एजंट्सनी आक्षेप का घेतला नाही, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
राहुल गांधींचे सादरीकरण बोगस -किरेन रिजिजू
राहुल गांधी यांनी केलेले सादरीकरण बोगस आहे. तर्कहीन गोष्टींना उत्तर दिले जात नाही. हरयाणात काँग्रेस त्यांच्याच अंतर्गत कलहामुळे हरली. देशातील युवा पिढी नरेंद्र मोदींसोबत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी मेहनत लागते. आम्ही इतक्या निवडणुका हरलो, परंतु व्यवस्थेवर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. राहुल गांधी कधी लष्कराला टार्गेट करतात तर कधी सुप्रीम कोर्टावर प्रश्नचिन्ह उभे राहतात. हे सर्व विचारपूर्वक केलेले षडयंत्र आहे. देशाबाहेरील शक्ती राहुल गांधींचा वापर करून देशातंर्गत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केला.