औरंगाबाद (बिहार) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीवरून सोमवारी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. मतदारयाद्यांची विशेष फेरतपासणी मोहीम (एसआयआर) हे मतचोरीचे नवे हत्यार असल्याचे गांधी म्हणाले आणि त्यांनी 'एक व्यक्ती, एक मत' तत्त्वाचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला. ज्या मतदारांनी लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत मतदान केले, मात्र त्यांची नावे बिहारमधील 'एसआयआर' प्रक्रियेत वगळण्यात आली, अशा मतदारांच्या समूहाशी चर्चा केल्यानंतर राहुल यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप वाहिनीवरून वरील मत व्यक्त केले. सासाराममध्ये रविवारी 'व्होट अधिकार यात्रे'ला गांधी यांनी सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी मतदारांच्या समूहाशी चर्चा केल.
एसआयआर हे मतचोरीचे नवे हत्यार आहे, आपल्यासमवेत ज्या व्यक्ती दिसत आहेत त्या व्यक्ती मतचोरीचा जिवंत पुरावा आहे. या सर्वांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले, मात्र बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांची नावे भारताच्या लोकशाहीतून पुसून टाकण्यात आली आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
भाजप आणि निवडणूक आयोग यांचे संगनमत त्यांना बहुजन आणि गरीब म्हणून ढकलत आहे, इतकेच नव्हे तर आपल्या जवानांचीही गय करण्यात आली नाही. सामाजिक सापत्नभाव आणि आर्थिक स्थिती यामुळे ते यंत्रणेच्या कटकारस्थानाविरुद्ध लढण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत, असेही गांधी यांनी स्पष्ट केले.