नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर याला जामीन मंजूर झाल्याविरोधात आवाज उठवल्यानंतर पीडितेला कथित गैरवर्तणूक सहन करावी लागली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी तिची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की भारत केवळ ‘मृत अर्थव्यवस्था’ होत नाही, तर ‘मृत समाजा’कडेही वाटचाल करत आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील दोषी आणि भाजपचे हकालपट्टी झालेले माजी आमदार सेंगर याला जामीन मंजूर केल्यानंतर पीडितेने दिल्लीमध्ये आंदोलन केले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी पीडितेची भेट घेतली. या भेटीत पीडितेसोबत तिची आईही उपस्थित होती. राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांनीही पीडितेच्या कुटुंबाला न्याय आणि सुरक्षा मिळवून देण्यासाठी आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
पीडिता आणि तिच्या आईने सेंगरविरोधातील खटला सर्वोच्च न्यायालयात लढण्यासाठी नामांकित वकिलाची मदत मिळावी, अशी विनंती राहुल गांधी यांना केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तसे करण्याचे आश्वासन दिले. पीडितेने आणि तिच्या कुटुंबीयांनी सुरक्षिततेची भीती असल्याने आणि छळ होण्याची शक्यता वाटत असल्याने, काँग्रेसशासित राज्यात स्थलांतर करण्यासाठी मदतीचीही विनंती केली. पीडितेच्या पतीनेही चांगल्या नोकरीसाठी मदत मागितली असून, राहुल गांधी यांनी त्याबाबत पाहू, असे आश्वासन दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
२०१७ मधील उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेने बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने सेंगरची शिक्षा स्थगित करून जामीन दिल्याच्या निर्णयाला आपल्या कुटुंबासाठी ‘काळ’ (मृत्यू) असे संबोधले आणि या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.